10 वे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव Pudhari
छत्रपती संभाजीनगर

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

10 वे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग असलेल्या विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रोझोन मॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, महोत्सव संयोजक नीलेश राऊत, डॉ. रेखा शेळके, प्रा. शिव कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री. नंदकिशोर कागलीवाल यांनी यावेळी बोलताना रसिक प्रेक्षकांसाठी या प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, हे प्रदर्शन केवळ चित्रपटांचे कौतुक करण्याची संधी नाही, तर चित्रपट इतिहासाची सखोल ओळख करून देणारे व्यासपीठ आहे. रसिकांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी.

महोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष असल्यामुळे आम्हा सर्वांना या महोत्सवाची उत्सुकता आहे. यावर्षी ६० हून अधिक दर्जेदार चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव मराठवाड्यातील रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण देशभरातून चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होत असल्याचे डॉ. गाडेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना महोत्सव संयोजक नीलेश राऊत म्हणाले, या चित्रपट प्रदर्शनात जुन्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा प्रवास दाखविण्यात आला आहे, जो रसिक प्रेक्षकांसाठी भूतकाळातील स्मृतींचे दालन उघडणार आहे. या प्रदर्शनात दाखविण्यात आलेला सिनेप्रवास प्रेक्षकांना जुन्या आठवणीत रमवेल आणि त्यांना एक संस्मरणीय अनुभव देईल, असा मला विश्वास आहे.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये : या प्रदर्शनात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या चित्रपटांसाठी खास विभाग तयार करण्यात आला आहे. याशिवाय श्याम बेनेगल, राज कपूर, प्र.के.अत्रे, मोहम्मद रफी, ऋत्विक घटक आणि तपन सिन्हा या दिग्गजांच्या स्मृतींना अभिवादन करणारे आणि त्यांच्या चित्रपटांचा वारसा जपणारे चित्र प्रदर्शन रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हे प्रदर्शन १९ जानेवारी २०२५ पर्यंत सर्वांसाठी खुले असून, चित्रपट रसिकांनी या विशेष प्रदर्शनासह महोत्सवाला भेट देऊन याचा भाग बनावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT