मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर : टेम्पो चोरांना रोखण्यासाठी फौजदाराकडून गोळीबार

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड येथून चोरलेला टेम्पो घेऊन आरोपी जळगाव रोडने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत असल्याची टीप मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झाल्टा फाटा येथे टेम्पो रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने एका पोलिसाला उडविण्याचा प्रयत्न करून टेम्पो बीड रोडने पळविला. निपाणी मार्गे दहा कि.मी. पाठलाग करून टाकळी शिवारात पोलिसांनी त्याला गाठले. तेथेही तो अंगावर टेम्पो घालण्याच्या तयारी असल्याने उपनिरीक्षक मधुकर मोरे यांनी टायरच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर टेम्पो चालक उडी मारून पळून गेला. पोलिसांनी दोघांना अटक केली. रविवारी (दि. 13) दुपारी चार वाजताच्या सुमारास हा थरार घडला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.

गौसखाँ अब्दुलखॉं पठाण (50, रा. आडगाव माहुली), शेख सलमान शेख कैसर (20, रा. हर्सूल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शेख समीर हा चालक पसार झाला. त्यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात कलम पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, साईनाथ नारायण गाडेकर (37, रा. पिंप्री, ह.मु. बालाजीनगर, सिल्लोड) यांचा टेम्पो (क्र. एमएच 20, डीई 6223) सिल्लोड येथील आरएल पार्क या मोकळ्या जागेवरून 10 ऑगस्टच्या रात्री चोरीला गेला होता. ११ ऑगस्टला सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, याच वर्णनाचा टेम्पो जळगाव रोडने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मधुकर मोरे यांना मिळाली. मोरे हे अंमलदार घुगे, तिडके, ढवळे, खंदारे, सोनवणे यांना घेऊन झाल्टा फाटा येथे पोहोचले. संशयित टेम्पो येताच पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने अंमलदार तिडके यांच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रसंगावधान राखून बाजुला उडी घेतल्यामुळे जीव वाचला. चालकाने टेम्पो न थांबविल्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. पोलिस मागावर असल्याचे समजताच चालकाने निपाणी फाटा येथून निपाणीच्या दिशेने टेम्पो वळविला. पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने जात टाकळी शिवारात रेल्वे पुलाखाली त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्याने अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपनिरीक्षक मुधकर मोरे यांनी टायरच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. दरम्यान गोंधळलेला चालक उडी मारून पळून गेला. यावेळी पोलिसांनी अन्य दोघांना जागेवरच पकडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT