छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाने मित्राच्या डोक्यात गट्टू घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि.५) रात्री ११ च्या सुमारास पुंडलिक नगर परिसरात स्वामी समर्थ कमानीच्या बाजूला घडली. या प्रकरणी आरोपी रोहित सर्जू चौधरी (वय १०, रा. न्यायनगर गल्ली) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, आरोपी रोहित चौधरी आणि त्याचा मित्र युपीचे राहणारे असून एकत्र काम करतात. शनिवारी दोघांनी एकत्र दारू पिली. यानंतर दोघेही दौलत बंगला येथील प्राची हॉस्पिटल समोर गप्पा मरत थांबले होते. रात्री 10.30 च्या सुमारास रोहितने पुन्हा दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने रोहितने मित्राच्या डोक्यात बाजूलाच पडलेला गट्टू घातला. यात त्याचा मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.