पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यात चोरी चोरी चुपके चुपके वाळू, मुरूम तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा फायदा घेऊन एका तोतया लिपिकाने पैठण तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून मुरूम वाळू तस्करी करणाऱ्या वाहनधारकाकडून पैशाची वसुली करीत असल्यामुळे काही वाहन चालकाने या लिपिकाला गुरुवारी दि.१४ रोजी सायंकाळी बिडकीन पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि गणेश सुरासे यांनी सुरू केला आहे.
बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुलानी वाडगाव परिसरातील रहिवासी असलेल्या महेश गोरक्षनाथ देवडे वय २१ या तरुणाने पैठण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये लिपिक या पदावर कार्यरत असल्याचे बनावट शासनाचे ओळखपत्र तयार करून वाळू, मुरूम, डब्बर, खडी तस्करी करणाऱ्या वाहनधारकाकडून गेल्या काही दिवसापासून तहसील मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात या नावाखाली हप्ते वसूल करण्याचा उद्योग सुरू केला होता. गुरुवारी दि.१४ रोजी नेहमीप्रमाणे वाळू मुरूम तस्करी करणाऱ्या वाहनाची झाड झडती घेऊन पैशाची मागणी करीत असताना.
काही वाहनधारकाने या तोतया लिपिकाला सरळ बिडकीन पोलीस ठाण्यात आणून सपोनि गणेश सुरासे यांच्यासमोर हजर करून सदरील प्रकार सांगितला यानुसार या प्रकरणाची सविस्तर चौकशी सपोनि गणेश सुरासे यांनी सुरू केले असून. बनावट ओळखपत्र तयार करून देणारी टोळी पैठण तहसील कार्यालयात सक्रिय असल्यामुळे यामध्ये कोणत्या महसूल अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे यासंदर्भात बिडकीन पोलीसांनी तोतया लिपिक यांनी वापरलेल्या मोबाईल वरून तपास सुरू केला आहे.