बीड ः येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या शिकलकरी वस्तीतील पत्र्याच्या शेडजवळ शुक्रवारी सकाळी एका 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. उत्तरीय तपासणी अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
नौशाद खामरोद्दीन सय्यद (वय 27, रा. इस्लामपुरा, पाण्याच्या टाकीजवळ, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास बसस्थानकाच्या पाठीमागील भागात एक इसम निपचित पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह तोंडावर पडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पुराव्यांची संकलन केले. दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत नौशाद हा अनेक महिने घरच्यांच्या संपर्कात न राहता नशेखोरांच्या संगतीत असायचा.
ज्या ठिकाणी मृतदेह आढळला, तिथे तो झोपलेल्या अवस्थेत होता. त्याचे तोंड जमिनीकडे असल्याने आणि नाक दाबले गेले होते. पोलिसांनी केलेल्या ‘इनक्वेस्ट’पंचनाम्यात मृतदेहावर कोणत्याही दृश्य जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य काही कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले जात असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
शवविच्छेदन अहवालातून कारण समोर येणार
आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक तपासणीही पूर्ण केली आहे. संबंधित तरुण व्यसनाधीन लोकांच्या संपर्कात होता आणि घरी जात नसे, अशी माहिती मिळाली आहे. सध्या आम्ही या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करत असून, उत्तरीय तपासणी अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी दिली.