बीड : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूचे वार करत खून केल्याची घटना बीड शहरात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
यश देवेंद्र ढाका (२२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश ढाका याचे एका तरुणासोबत गुरुवारी दुपारी भांडण झाले होते त्यानंतर याच भांडणाचा जाब विचारण्यासाठी यश हा त्याच्या मित्रांसह माने कॉम्प्लेक्स परिसरात त्या तरुणाकडे गेला होता. यावेळी देखील दोघांमध्ये वाद झाला आणि त्या तरुणाने यश ढाका याच्यावर चाकूचे वार केले. यावेळी परिसरात असलेल्या काही लोकांनी यश याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यश हा बीड येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे.
खून प्रकरणाची ही घटना समजल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. आरोपीला तत्काळ अटक करावे अशी मागणी देखील या नातेवाईकांनी केली. दरम्यान पोलिसांनी सुरज काके नावाच्या एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.