नेकनूर ः मोठे उत्पन्न असलेल्या नेकनूर ग्रामपंचायतीला अनेक वर्षांपासून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयश आल्याचा आरोप करत शिक्षक कॉलनी व दवाखाना परिसरातील महिलांसह नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत धडक देत जोरदार निदर्शने केली. पाणी, रस्ते व नाली या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधत संतप्त महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिसराची पाहणी करण्यासाठी सोबत नेले.
नूतन ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. उन्हाळ्यात घरांतील बोअरवेल आटल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागते किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते, तर पावसाळ्यात रस्ते व नाली नसल्याने हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, अशी तक्रार त्यांनी केली.
शिक्षक कॉलनी परिसराला वस्ती होऊन 30 ते 40 वर्षे उलटली असतानाही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. दरवर्षी ग्रामपंचायतीसमोर मोर्चे, निवेदने व पाठपुरावा करूनही प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विविध योजनांतून कोट्यवधी रुपये पाणीपुरवठा योजनेवर खर्च होऊनही नेकनूरची पाणी समस्या अद्याप सुटलेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित भागातील नालीचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले. तसेच पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकरची मागणी करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
‘रील काढायला आलोत’ या वक्तव्याने संताप
मागण्या घेऊन ग्रामपंचायतीत आलेल्या महिलांना काहींकडून तुम्ही रील काढायला आलात का? असे बोलण्यात आल्याची भावना व्यक्त करत महिलांनी संताप व्यक्त केला. तसेच नळ योजनेसाठी खोदलेले रस्ते अद्याप दुरुस्त न झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला. अरुंद रस्ते, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडेही यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.