बीड

Beed Woman jewellery theft | सराईत चोराच्या चोरीचा असा लावला पोलिसांनी छडा, तब्बल ६ लाखांचे दागिने लंपास करणारी महिला ताब्यात

मुंबईसह अनेक ठिकाणी तिच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असलेली सराईत चोर असल्याचे निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

केज - बीड जिल्ह्यातील केज येथील एका सराफी दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या बुरखाधारी तीन अनोळखी महिलांनी दुकानातील, सहा लाखाचे, ४७ ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे गंठण चोरून नेले होते. त्यापैकी एका महिलेला चार लाख रु. च्या मुद्देमालासह केज पोलिसांनी मालेगाव (नाशिक) येथून ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती अशी की, दि. १ जुलै २०२६ रोजी दुपारी केज शहरातील हनुमान ज्वेलर्स या दुकानात तीन बुरखाधारी महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. त्यांनी दागिने बघण्याच्या बहाण्याने दुकानातील सुमारे ५ लाख ९९ हजार ९९५ रु. किमतीचे ४७ ग्रॅम वजनाचे चार गंठण हातोहात लांबवून त्या पसार झाल्या. त्या नंतर हा प्रकार लक्षात आल्या नंतर केज पोलिस ठाण्यात दुकानदार व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून त्या तीन अनोळखी महिला विरुद्ध गु. र. नं. ४६२/२०२६ भा न्या सं ४०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला.

असा लावला चोरीचा तपास

गुन्हा दाखल झाल्यानंतर केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शोध शाखेचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

पोलिसांनी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मोबाईल कॉलची गुप्तपणे माहिती घेतली. या तपासातून एक संशयित कार पोलिसांच्या निदर्शनास आली. एमएच ०५/एएक्स ७६८५ क्रमांकाची ही कार घटनास्थळापासून काही अंतरावर आढळून आली. तांत्रिक विश्लेषणातून एका संशयित मोबाईल क्रमांकावरून करण्यात आलेले कॉलही पोलिसांच्या हाती लागले.

वरिष्ठांच्या परवानगीने गाठले थेट मालेगाव

सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित कारची माहिती मिळाली. तसेच संशयित मोबाईल क्रमांकावरून करण्यात आलेल्या कॉलची माहितीही पोलिसांच्या हाती लागली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांना तपासाची माहिती देण्यात आली.

त्यांच्या परवानगी नंतर राहुल सूर्यतळ यांनी स्थानिक डी बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलिस निरीक्षक अमीरोद्दीन ईमानदार यांना आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलिस निरीक्षक अमीरोद्दीन ईमानदार, पोलिस कॉन्स्टेबल नितीन वारे, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, महिला पोलिस भालेराव, गृहरक्षक दलाचे थोरात यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव गाठले. मालेगाव येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशन व सीडीआर यांच्या तांत्रिक विश्लेषण या आधारे मालेगाव शहरातील विजय नगर भागातून रिजवाना जाकीर शेख या ३५ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले.

रिजवानाच्या दोन साथीदार महिलांचे नावे समजली

दागिने चोर रिजवाना शेख हिला ताब्यात घेऊन तिचे केलेल्या चोरीचे तिला सीसीटीव्ही फूटेज दाखविल्यानंतर तिला पोलिसी खाक्या दाखविताच तिने तिच्या साथीदार असलेल्या आन्नु ऊर्फ साजीदा बशीर खान वय (३६ वर्ष, रा. कमालपुरा मालेगांव जि. नाशिक) आणि मन्नू ऊर्फ मनसजाखान (रा. विजयनगर मालेगांव जि. नाशिक) या दोघी आहेत. पोलिस त्याचा तपास घेत आहेत.

मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी दागिने चोरणारी रिजवाना शेख हिच्याकडून तिने केज येथून चोरलेले ३१ ग्रॅम वजनाचे तीन मिनी गंठण आणि ५९ सोन्याचे मणी असा एकूण ४ लाख ४ हजार रु. चा मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे असलेल्या सराईत चोर

रिजवाना शेख आणि तिच्या साथीदार यांच्या विरुद्ध मुंबई येथील नागपाडा, कुर्ला आणि धुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

केज पोलिसांची दमदार कामगिरी

रिजवाना शेख हिला केज पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे. आता या दागिने चोरी करणाऱ्या महिलांकडून त्यांनी राज्यात केलेल्या अनेक चोरींच्या घटनांचा पर्दाफाश होऊ शकतो. रिजवाना शेख हिला केज न्यायालयाने १४ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपासासाठी पोलिस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT