Will the Irrigation Department's divisional office be shifted to Parbhani?
रविंद्र जोशी
परळी, पुढारी वृत्तसेवाः परळीतील बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय परभणी येथे स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. याबाबतचे प्रशासकीय आहवालही त्यादृष्टीने देण्यात आले असल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. नुकतीच गेला १८ तारखेला गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक झाली.
या बैठकीत जलसंपदा विभागाची विविध कार्यालये व आस्थापनांची पुनर्रचना करण्याचे विषय व त्याबाबतच्या पुनर्रचनेचा आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने परळीत वर्षानुवर्षे कार्यरत राहिलेले मंडळ कार्यालय आता परभणीला हलवले जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीही अनेक वेळा अशाच पद्धतीने हे मंडळ कार्यालय परळीतून हलविण्याचा घाट घालण्यात आला होता. यापूर्वी गोपीनाथराव मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आ. धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा करून त्या त्या वेळी त्याला स्थगिती मिळवली होती.
परळी शहरातील सिंचन भवन इमारतीत बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय गेल्या ३० वर्षापासून कार्यरत आहे. या कार्यालयातुन बीड, लातुर, व परभणी जिल्ह्यातील काही भाग अशा तीन जिल्ह्यांचा कारभार चालतो. या कार्यालयासाठी सिंचन भवनची इमारत, आवश्यक कर्मचारी वर्ग, सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध असतांनाही हे कार्यालय परभणी येथे स्थलांतरीत करण्याचा डाव आखला जात आहे.
प्रशासन पातळीवरील काही वरिष्ठ अधिकारी त्यासाठी प्रयत्नशील असुन त्यांनी प्रशासकीय पातळीवर स्थलांतराच्या हालचाली वेगाने सुरू केल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला असून काही दिवसांतच हे कार्यालय परळीतून स्थलांतरित होणार हे जवळपास ठरले आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाचे परळीतील मंडळ कार्यालय परळीहून हलविण्याचे या अगोदरही अनेक वेळा प्रयत्न झालेले आहेत. सन २०१७ मध्ये हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी तत्कालीन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन याबाबतचा पाठपुरावा केला होता.
त्यानंतर या हालचाली थांबल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये पुन्हा हे कार्यालय लातूरला हलविण्याचा घाट रचण्यात आला. त्यावेळी तत्कालीन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून या स्थलांतराला स्थगिती घेतली होती. आता पुन्हा एकदा हाच स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासकीय आस्थापना पुनर्रचनेच्या नावाखाली हे कार्यालय परळीतून उठविण्याचा घाट घातल्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.
प्रशासनानचा अजब युक्तिवाद बीड पाटबंधारे विभागांतर्गत दोन विभागीय कार्यालये बांधकाम कार्यप्रकारातील आहेत. तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड या अंतर्गत चे दोन विभागीय कार्यालये सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारातील आहेत. चारही विभागीय कार्यालये परभणी मंडळ कार्यालय करून जोडल्यास प्रशासकीय दृष्टीने सोयीचे होईल. त्यामुळे परळी येथील अधिक्षक अभियंता बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परभणीला स्थलांतरित केल्यास बांधकाम व सिंचन व्यवस्थापन कामात सुलभता येईल तसेच प्रशासकीय दृष्टीने सोयीचे होईल असा युक्तिवाद प्रशासकीय आहवालात करण्यात आला आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार
दरम्यान याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने सिंचन भवनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत आपल्या स्तरावर काहीही हालचालींची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यास मंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मंत्रालय स्तरावर, वरिष्ठ पातळीवर अशी काही हालचाल सुरू असेल, याबाबत आमच्या स्तरावर काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.