Dharur News : शेतकरी कर्जमाफीच्या याद्या कधी लागणार ? file photo
बीड

Dharur News : शेतकरी कर्जमाफीच्या याद्या कधी लागणार ?

नवीन पीक कर्जाचा मार्ग कधी मोकळा होणार? धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

When will the lists for the farm loan waiver be released?

धारूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करून काही महिने उलटले, तरी धारूर तालुक्यातील अनेक शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या अंतिम यादीच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी पात्र असूनही अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या अंतिम याद्या कधी जाहीर होणार आणि खात्यावर रक्कम कधी जमा होणार? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

कर्जमाफीची प्रक्रिया प्रलंबित असल्याने अनेक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यात अडचणी येत आहेत. जुन्या कर्जाचा प्रश्न निकाली निघालेला नसल्याने बँकांकडून नवीन कर्जासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करताना अडथळे येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांवर पावसाअभावी मोठा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत पुढील हंगामासाठी बियाणे, खते, मशागत आणि इतर शेती खर्चासाठी भांडवलाची गरज आहे. मात्र, जुन्या कर्जाचा तिढा कायम असल्याने नव्या पीक कर्जाचा मार्गही अडचणीत आला आहे. दुष्काळ, घटलेले उत्पन्न आणि वाढता शेती खर्च या तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय केवळ सरकारी घोषणा न राहता प्रत्यक्ष खात्यावर पोहोचणे महत्वाचे आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या अंतिम याद्या जाहीर करून प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दुष्काळात कर्जमाफीचा दिलासा कधी ?

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिक वाढली असताना शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची गरज आहे. पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या तातडीने प्रसिद्ध करून त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करावी. तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करून तेही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी होत आहे. कर्जमाफीच्या याद्या जाहीर करण्यास नेमका विलंब का होत आहे, याबाबत शासन आणि संबंधित यंत्रणेने स्पष्टता देण्याची मागणीही शेतकऱ्यांतून होत आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर नवीन पीक कर्जासाठी मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अंतिम याद्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी

कर्जमाफी चादी। कर्जमाफीचा लाभ मिळवण्याच्या अपेक्षेने धारूर तालुक्यातील शेतकरी अंतिम यादीकडे लक्ष ठेवून आहेत. काही शेतकऱ्यांची नावे प्रक्रियेत आली असली, तरी अनेक पात्र शेतकरी अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नवीन पीक कर्ज मिळविताना अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कर्जमाफीची अंतिम यादी, प्रोत्साहनपर अनुदान आणि नवीन पीक कर्जाबाबत शासनाने तातडीने स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT