Parli News : दुष्काळाच्या विळख्यात पाणी; धरणावर पहारा ! file photo
बीड

Parli News : दुष्काळाच्या विळख्यात पाणी; धरणावर पहारा !

उपयुक्त साठा २० टक्क्यांच्या आत; परळी शहरासह १५ गावांचा पाणीप्रश्न गंभीर, अवैध उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची नजर

पुढारी वृत्तसेवा

Water crisis critical in Parli city and 15 villages

परळी, पुढारी वृत्तसेवाः दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब आता जपण्याची वेळ आली आहे. परळी तालुक्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून, तीन जलसाठ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा दहा टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. परळी शहरासह तालुक्यातील सुमारे १५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पातही आता केवळ १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची चिंता गडद झाली आहे. उपलब्ध जलसाठा आणखी कमी होऊ नये आणि पाण्याचा अनधिकृत उपसा रोखला जावा, यासाठी प्रशासनाने वाण धरणावर २४ तास पहारा तैनात केला आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण हा प्रशासनासमोरील सर्वांत मोठा प्रश्न बनला आहे. वाण धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून वाण प्रकल्पाच्या जलसाठ्यावर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. वाण मध्यम प्रकल्पाची एकूण क्षमता सुमारे १९.७१ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, सध्याचा उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आला आहे. हा जलस्रोत परळी शहराबरोबरच तालुक्यातील सुमारे १५ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे वाण मधील पाणीसाठा आणखी खालावल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील इतर जलसाठ्यांचीही परिस्थिती समाधानकारक नसल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यानंतर जलसाठ्यांनी काहीसा दिलासा दिला असला तरी पावसाअभावी उपलब्ध पाण्याचा वेगाने होणारा वापर आणि वाढते तापमान यामुळे जलसाठ्यांची पातळी सातत्याने कमी होत आहे.

त्यामुळे आता नवीन पाणी उपलब्ध करून घेण्यापेक्षा हातात असलेला जलसाठा किती काळ टिकवता येईल, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या पथकांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, तलाठी, महसूल सेवक, नगरपरिषद कर्मचारी, महावितरण कर्मचारी, लघुपाटबंधारे विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या वापरावर विविध विभागांच्या माध्यमातून थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे, अनधिकृत उपसा रोखणे आणि पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक बनले आहे. वाण धरणातील साठा कमी होत असताना पाणीपुरवठ्याचे भविष्यातील नियोजन, पर्यायी जलस्रोतांची उपलब्धता आणि टंचाईग्रस्त भागांसाठी आवश्यक उपाययोजना यांनाही आता वेग देण्याची गरज आहे.

वाण धरणातील उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आला आहे. परळी शहरासह तालुक्यातील सुमारे १५ गावांचा पाणीपुरवठा या जलस्रोत यावर अवलंबून आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरू आहेत. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये २४ तास पथके तैनात करण्यात आली आहेत.
- विनोद रणवरे तहसीलदार, परळी वैजनाथ

दोन पाळ्यांत २४ तास पहारा

वाण प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत अथवा अवैध उपसा होऊ नये, यासाठी प्रशासनाने दोन पाळ्यांमध्ये पथकांची नियुक्ती केली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी आठ आणि सायंकाळी आठ ते सकाळी आठ अशा दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी धरण परिसरात पहारा देणार आहेत. जलसाठ्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याबरोबरच अशा प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT