पावसात वडवणीकरांची उडाली दाणादाण pudhari photo
बीड

Beed rain impact : पावसात वडवणीकरांची उडाली दाणादाण

नव्याने बांधलेल्या नाल्या तुंबल्या; पदाधिकाऱ्यांवर संताप; व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

वडवणी ः गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शुक्रवारी वडवणी शहरालाही बसल्याचं पहायला मिळालं. वडवणी शहरातून जाणाऱ्या पाडळशिंगी ते लोखंडी सावरगाव राज्य मार्गाच्या बोगस कामाचे आज पितळ उघडे पडले आहे. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या, काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. तर अनेक दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वडवणी शहर व तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे वडवणीकरांची दाणादाण उडाली. नव्याने सुरू असलेल्या अहिल्याबाई होळकर चौक ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता व नाली कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यावर कोणतीच व्यवस्था न केल्यामुळे कित्येक दुकानांमध्ये पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरातील स्व.वसंतराव नाईक चौक, जिवाजी महाले चौक, वडवणी पोलीस ठाण्यासमोरील काही भाग आणि चिंचवड रस्त्यावरील काही ठिकाणी नाल्या तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले वाहनधारकांना व पायी चालणाऱ्या शहरवासीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. कंत्राटदाराकडून कमिशन घेऊन गप्प बसणाऱ्या काही नेत्यांमुळे आज वडवणीकरांचे बेहाल झाल्याचे दिसून आले.

वडवणी शहरातील या दीड किलोमीटर नाली व रस्ता कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी वडवणीकर करत आहेत. कोणाचेही या कामाकडे लक्ष नाही. संबंधित कंत्राटदार हे काम मनाला वाटेल तसे करत आहे. काही ठिकाणी नाल्या खाली तर काही ठिकाणी रस्ते उंच यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही. त्याचाच फटका आज व्यापाऱ्यांना बसला.

कंत्राटदारास सूचना करणार

वडवणी शहरात सुरू असलेले काम आता पूर्णत्वास आले आहे. सिमेंट रस्ता आणि नाल्याच्या मध्ये राहिलेली जी जागा आहे. त्यामध्ये सध्या माती साचलेली आहे. त्या मातीमुळे नालीचे छिद्रेे बंद पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी नालीत जाण्याऐवजी रस्त्यावर साचले आहे. संबंधित गुत्तेदारांना तशा सूचना देऊन पाणी काढून देण्याचे सांगण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते शेषेराव जगताप यांनी दिली.

नुकसान भरपाई द्या

गेल्या अनेक दिवसांपासून वडवणी शहरांमध्ये रस्त्याचे व नाल्याचे काम सुरू आहेत. संबंधित बांधकाम विभाग आणि गुत्तेदार यांना वारंवार सांगूनही कामात सुधारणा होत नाही. शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. वडवणी शहरातील एक मोबाईल शॉपी व दुसरे कटिंग सलूनचे दुकान यामध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करून नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख विनायक मुळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT