वडवणी : वडवणी शहरातील अनधिकृत पार्किंग आणि वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मागील आठवड्यात पार्किंग व वाहतुकीच्या प्रश्नावरून शहरात दोन गटांत मोठा वाद होऊन दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेत काही निरपराध नागरिकही जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनतळांची निश्चित जागा करणे आणि अनधिकृत पार्किंगला आळा घालणे ही अत्यंत महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे.
वडवणी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बँका, शाळा-महाविद्यालये तसेच व्यापारी संकुलांच्या परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. या प्रश्नावर आदर्श फाउंडेशनचे कार्यवाहक तथा डीसीसी बँकेचे माजी संचालक अमोल आंधळे यांनी पोलिस प्रशासन, नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन ठोस उपाययोजनांची मागणी केली होती.
या निवेदनाची आमदार प्रकाश सोळंके यांनी दखल घेतली असून, वडवणी शहरातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ निश्चित होण्याची आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, वसंतराव नाईक चौक, जाधव कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि चाटे चौक परिसरात गर्दीच्या वेळी वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होतो. विशेषतः बँका व बाजारपेठ परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्यावरच वाहने लावावी लागतात. त्यामुळे स्वतंत्र पार्किंगची जागा निश्चित करून नो-पार्किंग क्षेत्राची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
मागील आठवड्यातील वाद आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पार्किंगचा प्रश्न केवळ वाहतूक कोंडीपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशीही जोडला गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोंडी झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी पार्किंग व वाहतूक नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“वडवणी शहरातील प्रत्येक प्रमुख चौक व महत्त्वाच्या ठिकाणी पुढील दोन महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी. नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे.आ.प्रकाश सोळंके