विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड.
बीडचा जिल्हाधिकारी म्हणून दादांशी माझी पहिली सविस्तर भेट मुंबईत झाली. मला वाटले होते, ही औपचारिक ओळखीची भेट असेल. पण दादांनी पहिल्याच बैठकीत बीडच्या सर्वांगीण विकासाचा आराखडाच समोर मांडायला लावला. बीडचे इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वेचा प्रश्न, तरुणांच्या रोजगार-प्रशिक्षणाचे प्रश्न, रिक्त पदांची भरती एकेका विषयावर ते तपशीलात बोलत होते. त्या भेटीतून मी एक गोष्ट घेऊन बाहेर पडलो. या नेत्याला बीड फक्त पालकत्वाला मिळालेला जिल्हा म्हणून नको आहे; त्यांना बीडचे भविष्य घडवायचे आहे.
दादांची आठवण काढताना एक गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही. सकाळी साडेसहा-सात वाजता माझा फोन वाजायचा आणि पलीकडून दादांचा आवाज यायचा. खरे सांगायचे तर कित्येकदा दादांच्या फोननेच मला झोपेतून उठवले आहे. आम्ही अधिकारी गमतीने त्यांना अलार्म कॉल्स म्हणायचो. बीडमधली कुठलीही बातमी दादांच्या नजरेतून सुटत नसे. कधी कधी तर जिल्हाधिकाऱ्याला जी बातमी पोहोचायची असते, ती दादांकडून आधी समजायची. पण या कॉल्समध्ये जाब विचारणे नव्हते; त्यात एक वैयक्तिक जिव्हाळा होता आणि त्या जिव्हाळ्यासोबतच जबाबदारीची स्पष्ट अपेक्षाही होती. दादा गेल्यानंतर कित्येक दिवस पहाटे जाग आल्यावर नकळत फोनकडे पाहिले जायचे. ती शांतता अजूनही टोचते.
दादांचे प्रशासकीय आकलन थक्क करणारे होते. प्रत्येक विभागाची त्यांना खडान्खडा माहिती असायची. आकडे, तारखा, मागच्या बैठकीत कोणी काय मुद्दा मांडला होता, त्यावर काय सूचना दिल्या होत्या सगळे त्यांच्या लक्षात असे. एकदा सांगितलेली गोष्ट दादा कधीही विसरत नसत, त्यामुळे आम्हालाही विसरण्याची सोय नव्हती. ते ठरलेल्या कालमर्यादेत काम करून घेत. कामातली ढिलाई त्यांना अजिबात चालत नसे, पण चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे ते आवर्जुन कौतुक करत. आणि सर्वात महत्त्वाचे -त्यांच्यासमोर वेगळे, अगदी विरोधी मतही मांडण्याची मोकळीक होती. खरे बोलण्याचे धाडस दाखवले, तर ते स्वीकारण्याचा मोठेपणा दादांमध्ये होता. अधिकाऱ्यांच्या ते खंबीरपणे पाठीशी उभे राहत. जात, धर्म, पक्ष न पाहता विकासाची कामे करा आणि कुठल्याही दबावाखाली न येता काम करा, ही त्यांची शिकवण होती आणि तसे वातावरण त्यांनी स्वतः निर्माण करून दिले होते.
बीडमध्ये मोठा पूर आला, तेव्हाचे दादा मी कधीही विसरणार नाही. सलग दोन दिवस मुक्काम ठोकून त्यांनी गावोगावी पायपीट केली. त्या काळात दिवसाला दहा-पंधरा वेळा त्यांचे मला फोन येत. आणि पाहणी करताना ते नुसते व्यासपीठावरून आढावा घेत नसत; एकेका कुटुंबाच्या दारात जाऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेत. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्यातलेच एक होऊन वावरणे हा दादांचा स्वभाव होता. लोकांचे आधी ऐकायचे आणि मग प्रश्न पद्धतशीरपणे मार्गी लावायचा, ही त्यांची रीत मी जवळून पाहिली आणि तीच माझ्या कामाची पद्धत बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. परळीतला एक प्रसंगही आठवतो. दादांच्या पहिल्याच दौऱ्यात एका सामाजिक प्रश्नावरून मोठा जमाव आंदोलनाला उतरला होता. वातावरण तापले होते, पोलिस यंत्रणाही काहीशी धास्तावली होती. दादा थेट जमावात गेले आणि स्वतः बोलणी करून त्यांनी प्रश्न निवळवला. वाटाघाटी कशा करायच्या, हे मी त्या दिवशी दादांकडून शिकलो.
एवढा मोठा नेता, पण सामान्य माणसाला आपल्यामुळे त्रास होऊ नये याची त्यांना सतत काळजी असे. ताफ्यातला सायरन ऐकला की ते लगेच सांगत, “बंद करा तो.” माझ्यासाठी वाहतूक अडवू नका, ही त्यांची कायमची सूचना होती. आणि वक्तशीरपणा! एकदा दादांनी मला पहाटे साडेपाचची वेळ दिली होती. मी पहाटे सव्वापाचलाच विश्रामगृहावर पोहोचलो, तर दादा तयार होऊन बाहेर उभे. मला म्हणाले, “जिल्हाधिकारी साहेब, उशीर केलात.” ठरलेल्या वेळेच्या आधी पोहोचूनही उशीर झाल्याची जाणीव करून देणारा नेता मी पहिल्यांदाच पाहिला. राजकीय कार्यक्रमांमध्ये अधिकाऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये याचीही ते दक्षता घेत; ज्याचे काम नसेल त्याला ते स्वतःहून सांगत, “तुम्ही निघा, इथे बसण्याची गरज नाही.”
त्यांची नजरही तशीच बारीक होती. एका इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी दरवाजाच्या कामातली राहिलेली उणीवही त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणारा माणूस इतक्या बारीक गोष्टी पाहतो, याचे मला नेहमी नवल वाटे. स्वच्छतेवर त्यांचा विलक्षण कटाक्ष होता. मी स्वतः कित्येक वेळा पाहिले आहे त्यांना कुठे प्लास्टिक दिसले, की ते स्वतः वाकून उचलत आणि डस्टबिनमध्ये टाकत. जगात जिथे जिथे चांगल्या सुविधा आहेत, तशा आपल्या माणसांना मिळाल्या पाहिजेत, हे त्यांचे स्वप्न होते. नवे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा प्रशासनात वापर व्हावा यासाठी ते सतत आग्रही असत. पालकमंत्री म्हणून दादांनी बीडला निश्चित दिशा दिली. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. नव्या संकल्पचित्रांच्या आणि जीर्णोद्धार आराखड्याच्या प्रत्येक आढाव्यात दादा स्वतः बसत, प्रत्येक तपशील समजून घेत.
या आराखड्याला शिखर समितीची मान्यता मिळाली, पण ती पाहायला दादा आपल्यात नव्हते; ज्या क्षणाची त्यांनी आतुरतेने वाट पाहिली, तो क्षण त्यांच्या माघारी आला, याची खंत कायम राहील. आता हा जीर्णोद्धार पूर्ण करणे, हीच दादांच्या त्या ध्यासाची खरी सांगता ठरेल. बीड विमानतळाच्या विकासाची मुहूर्तमेढही दादांनीच रोवली. जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पाला गती, परळी विकास आराखडा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आराखडा, तरुणांच्या कौशल्यविकासासाठी सीआयआयआयटी -या प्रत्येक कामामागे दादांचा पाठपुरावा उभा होता. जिल्हा क्रीडा संकुलासाठी नुकताच मंजूर झालेला निधी हे तर दादांच्या दूरदृष्टीचेच फळ; क्रीडा क्षेत्रासाठी एवढी मोठी तरतूद या जिल्ह्याने यापूर्वी कधी पाहिली नव्हती.
बीडची पुढची पिढी राज्याला सक्षम खेळाडू देईल, हा विश्वास त्यामागे होता. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात वसतिगृहे उभी राहावीत, आई-वडिलांच्या स्थलांतरामुळे कुणाही मुलाची शाळा सुटू नये आणि त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी दादा आग्रही होते. याच कामगारांच्या आरोग्यासाठी सुरू झालेला आरोग्य साथी उपक्रम मजूर महिलांमधूनच आरोग्यदूत घडवणारा दादांच्या माणूसकेंद्री विचारांचेच रूप आहे. एखादा मुद्दा त्यांना पटला, की ते तो हातात घेत आणि लवकरात लवकर मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसत नसत.
दादांनी बीडसाठी जे स्वप्न पाहिले, ते पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांनी आखून दिलेल्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि दादांनी घालून दिलेला सर्वात मोठा धडा जात, धर्म, दबाव या कशाच्याही मर्यादा न ठेवता, केवळ लोकांसाठी काम करायचे हा जिल्ह्याच्या प्रशासनाचा स्थायीभाव राहील, याची मी ग्वाही देतो.
दादांना जाऊन सहा महिने उलटून गेले. पण या सहा महिन्यांतला एकही दिवस असा गेला नाही, की ज्या दिवशी दादांची आठवण झाली नाही. काही माणसे पदामुळे मोठी होतात; दादा मात्र असे होते की, पद त्यांच्यामुळे मोठे झाले. बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझ्या प्रशासकीय आयुष्यातले भाग्य समजतो.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी दादांसोबत झालेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते रेल्वेचे उद्घाटन होते; वेळापत्रक प्रचंड व्यग्र होते, क्षणाचीही उसंत नव्हती. पण अशा धावपळीतही दादा माझ्या मुलीजवळ थांबले आणि तिच्याशी दहा-पंधरा मिनिटे आपुलकीने गप्पा मारत राहिले. करारी प्रशासक म्हणून महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, त्या दादांचे हे मायाळू, प्रेमळ रूप त्या छायाचित्रात कायमचे बंदिस्त झाले आहे. त्या दिवशीचा त्यांचा उत्साह आठवला की वाटते, दादा कुठेही गेलेले नाहीत. बीडच्या मातीत त्यांनी पेरलेली स्वप्ने उगवत राहतील, तोवर दादा आमच्यातच आहेत. दादा, तुमचे स्वप्न पूर्ण करू. हाच शब्द.