पोलीस ठाणे केज  pudhari photo
बीड

विष्णू चाटे ,जयराम चाटे यांची केज पोलीस ठाण्यात चौकशी

Beed News : गुन्ह्यातील तिन्ही गाड्या केज पोलीस ठाण्यात

पुढारी वृत्तसेवा

केज : केज संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी ज्या खंडणी प्रकरणाचा सबंध जोडला जात आहे; त्या खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकरणातील सीआयडीच्या ताब्यात असलेले आरोपी अनुक्रमे विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांना तपासासाठी केज पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.

या बाबतची माहिती अशी की, मस्साजोग ता. केज येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्या पूर्वी आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रू. ची खंडणी मागण्यासाठी गेलेला विष्णू चाटे याने त्याच्या मोबाईल फोन वरून वाल्मीक कराड यांचे आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करुन दिले होते.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये नंतर विष्णू चाटे हा देखील फरार झाला होता. त्या नंतर तब्बल दहा दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले होते; असे पोलीस सांगत असले तरी विष्णू चाटे मात्र स्वतः हजर झाला असल्याची चर्चा आहे.

खंडणी प्रकरणी विष्णू चाटे याला १० जानेवारी पर्यंत वाढीव सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तर जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना तांबवा येथून ताब्यात घेतले होते. जयराम चाटे याची १८ जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी आहे. विष्णू चाटे आणि जयराम चाटे हे दोघेही अनुकुमे खंडणी आणि हत्या या दोन प्रकरणात सध्या सीआयडी कोठडीत आहेत.

विष्णू चाटे गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करण्यासाठी आणि जयराम चाटे यांच्याकडून विविध माहिती व पुराव्यासाठी दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास सीआयडीच्या पथकाने केज पोलीस ठाण्यात आणून त्यांची सुमारे चार तासापेक्षा जास्त वेळ कसून चौकशी केली आहे.

गुन्ह्यातील तिन्ही गाड्या केज पोलीस ठाण्यात

संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच-४४/झेड-९३३३) तसेच वाल्मीक कराड याला सीआयडीच्या कार्यालयात घेवून जाण्यासाठी वापरलेली शिवलिंग मोराळे यांची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्र. (एम एच-२३/ बी जी-२२३१) आणि विष्णू चाटे याची पांढऱ्या रंगाची फोर्ड अशा तिन्ही गाड्या केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रवादी कार्यालयाची झाडाझडती

दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वा. च्या सुमारास केज येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्क कार्यालयात घेवून जात तपास केला. तर याच राष्ट्रवादी कार्यालयावर केज बंदच्या काळात दगडफेक झाली होती.

डॉ. संभाजी वायबसे , ॲड सुरेखा वायबसे यांची पुन्हा चौकशी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आर्थिक रसद ज्यांनी पुरविली अशा डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी ॲड. सुरेखा वायबसे यांची सीआयडीच्या पथकाने दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास बोलावून अधिक चौकशी केली आहे .

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने देखील केजमध्ये

एस आय टी पथकामध्ये ज्यांचा समावेश करण्यात आला आहे ते बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा निवडणूक निकाला दरम्यान एकमेकांना मिठी मारलेला फोटो व्हायरल झाला असल्याने त्यांच्या नियुक्ती बद्दल वादंग निर्माण झाले आहे. वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे दि. ८ जानेवारी रोजी देखील केज पोलीस ठाण्याच्या परिसरात आलेले होते. मात्र ते कशासाठी आले होते ? याचा तपशील समजू शकलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT