खा.बजरंग सोनवणे यांच्‍या मुलावर गुन्‍हा दाखल करावा. या मागणीसाठी केज पोलिस ठाण्यात प्रेतासह हे आंदोलन करतांना नातेवाईक व गावकरी. pudhari photo
बीड

Kej Crime : केज खूनप्रकरण तापले; अंत्यसंस्कार रोखून कुटुंबीयांचा ठिय्या

खा. सोनवणे यांच्‍या मुलावर आरोप : गुन्हा दाखल करण्याची मागणी, तीन दिवसांपासून अंत्यसंस्कार रखडले; केजमध्ये कडकडीत बंद, रास्‍ता रोको

पुढारी वृत्तसेवा

केज : केज तालुक्यातील कदमवाडी फाटा येथे हॉटेल व्यावसायिक विलास घुले (वय 30, रा. टाकळी) यांच्या खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत.

या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी केज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. आमदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

नऊ जणांवर गुन्हा

२० जून रोजी ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले हे त्यांचे मित्र उमेश माने यांना मारहाणीतून सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या घुले यांचा रविवारी (दि.२१) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भय्यासाहेब गायकवाड, अजय ऊर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिस ठाण्यातच ठिय्या

मंगळवारी दुपारी नातेवाईकांनी विलास घुले यांचा मृतदेह थेट केज पोलिस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थितीचे पाहून पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार नातेवाईकांनी केला.

खासदारपुत्रावर गंभीर आरोप

या प्रकरणात खा. बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर आरोपींचा त्यांच्याशी संपर्क झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व बाबींची चौकशी करून सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

नेमकी घटना काय?

टाकळी येथील उमेश माने यांचे कदमवाडीतील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा वाद उद्भवल्याचे सांगितले जात आहे. याच कारणावरून काहीजण शनिवारी (20) दुपारी उमेश माने यांचा शोध घेत टाकळी येथे आले होते. त्यावेळी ते मित्र हाॅटेल मालक विलास घुले यांच्यासोबत त्यांच्या ‘गावकरी’ हॉटेलवर बसले होते. आरोपी आल्याचे लक्षात येताच उमेश माने यांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग सुरू असताना मित्राला वाचविण्यासाठी धावलेल्या विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान रविवारी (21) दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT