केज :- विलास घुले खून प्रकरणी मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी. या मागणीसाठी जमावबंदीचा आदेश झुगारून मयत विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले, त्यांचे कुटुंबीय यांच्यासह बाळासाहेब सानप, संजय केदार अशा ४८ जणांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील विलास घुले हे त्यांच्या मित्र उमेश माने याने एका विवाहित महिलेशी बळजबरीने लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची व तिचा पती आणि मुलांना जीवे मारून नांदणे मोडण्याची धमकी देवून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करून लैंगिक छळ करण्याच्या संशया वरून त्याला जमाव मारहाण करीत असताना मित्राला सोडवायला गेलेल्या विलास घुले यांचा धारदार चाकूने भोकसून खून करण्यात आला होता.
या प्रकरणी मयत विलास घुले यांचे भाऊ फिर्यादी रमेश घुले यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात खा. बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांचे नाव घेऊन ते या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी दि. १२ सप्टेंबर रोजी केज बीड महार्गावर टाकळी फाट्यावर पाच तास रस्ता रोको आंदोलन करून रहदारीस अडथळा निर्माण केला होता.
या रस्ता रोको आंदोलनात मयत विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले, बाळासाहेब सानप, संजय केदार या प्रमुखासह नितिन रामहारी घुले, सोनु बिभिषण घुले, रामहारी घुले, भैय्या शिवाजी घुले, अशोक रावसाहेब बारगजे, अचित पांडुरंग घुले, बालाजी गणपत बारगजे, ऋषीकेश चिंतामण सानप, केशव तांदळे यांच्यासह ३० ते ३५ असे एकूण४३ ते ४८ अनोळखी महिला व पुरुष यांच्या विरुद्ध सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद चव्हाण यांच्या तक्रारी वरून गु र नं ५८५/२०२६ भा न्या सं १८९(२), १२६(२), १२३ आणि एम पी ए कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे हे करीत आहेत.