बीड ः राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.अजितदादा यांच्या माध्यमातून बीडकरांनी विकासाचे आशादायी चित्र पाहिले होते. स्व.अजितदादांनी अनेक विकास कामांना मंजुरी देत नवे विकासाचे व्हिजन लोकांसमोर मांडले होते. त्यांच्या संकल्पनेतील विकास कामे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे.
राजकारणापेक्षा विकासकामे महत्वाची आहेत, त्यामुळे स्व.अजितदादांच्या संकल्पनेतील विकासकामे पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई आणि बीडमधील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
आ. विजयसिंह पंडित यांनी सोमवार, दि.11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत गेवराई विधानसभा मतदार संघासह बीड शहरातील विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी रेशीम पार्क, गेवराई एमआयडीसी, आपत्ती सौम्यीकरणातील कामे, बीड एमआयडीसी, बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास होत असलेला विलंब, बीड शहरातील अमृत पाणीपुरवठा योजना, अर्धवट अवस्थेतील भुयारी गटार योजना, विज्ञान केंद्र व तांरागणाचे बांधकाम, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नुतणीकरण, क्रीडा संकुला विकास आराखडा, स्व.अजितदादा पवार यांचे स्मारक, मौजे कपिलधारवाडी गावाचे पुर्नवसन आदी सार्वजनिक महत्वाच्या बाबींच्या अनुषंगाने तपशिलाने चर्चा झाली.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व बीड नगर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती शेख निजाम, गटनेते फारुक पटेल, नगरसेवक अशफाक इनामदार यांसह मान्यवरांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, उपजिल्हाधिकारी प्रभुदय मुळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तोंडे, बीड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र पवार एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक अतुल पाथरे, जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ऋषिकेश चिरके, बीड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विशाल हात्ते, महामार्ग विभागाचे अभियंता राजेंद्र भोपळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता आर्षद, नगर परिषदेचे अभियंता इपल्ली यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
अमृत अटल योजनेवरही चर्चा
बीड शहरासाठी सन 2017 मध्ये मंजूर झालेली अमृत पाणीपुरवठा योजना अद्याप नगर परिषदेकडे हस्तांतरित झाली नसल्या बाबत सविस्तर चर्चा झाली. योजनेतील जलकुंभ बंद असून वितरण व्यवस्था अपूर्ण असण्यासह इतर तांत्रिक बाबींवर चर्चा झाली. सन 2018 मध्ये 165 कोटी रुपये किंमतीची भुयारी गटार योजना अर्धवट असतानाही कंत्राटदारांनी कोट्यावधी रुपयांची उचल केली. या दोन्ही योजनेतील कंत्राटदारांनी काम न करता शेकडो कोटी रुपये उचल केल्याचे निष्पन्न झाले.
या बाबत मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही करून पाणी मलनिस्सारणाच्या संदर्भात नव्याने कार्यवाही करण्याचा निर्णय झाला. बीड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गा 361 एफ चे काम विलंबाने होत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्ग आणि नाल्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
महामार्गाच्या अभियंत्यांकडून अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे बीड शहरातील पाण्याचा निचरा पावसाळ्यात होणार नाही, भविष्यातील या गंभीर अडचणींबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी खंबीर भूमिका घेत कंत्राटदारावर वेळेत काम न झाल्यास गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेता नगर पालिका आणि महामार्गाच्या अभियंत्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.