Vaidyanath factory sale case: Pankaja Munde's statement
परळी, पुढारी वृत्तसेवाः आर्थिक अडचणीत असलेले अनेक कारखाने ताळेबंद असून अनेक वर्षांपासून त्यांना गंज लागलेला आहे. मात्र आपण तसे न होऊ देता शेतकऱ्यांचे हित कशात आहे? या दृष्टिकोनातून निर्णय घेतला. काही लोक जाणीवपूर्वक व विनाकारण मुंडे साहेबांचा आत्मा, मुंडे साहेबांचे अपत्य विकलं वगैरे टीकाटिप्पणी करताना दिसतात. मात्र कारखाना विकला नसुन आपण मुंडे साहेबांचे हे चौथे अपत्य जगविले असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
वैद्यनाथ कारखाना विक्रीच्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. या विषयात पंकजा मुंडे यांनी रविवारी परळीत झालेल्या कार्यक्रमात थेट भाष्य केले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केला. त्याला जीवापाड जपले.
एखाद्या चौथ्या आपत्याप्रमाणे या कारखान्याचा सांभाळ मुंडे साहेबांनी केला. मुंडे साहेबांच्या पश्चात आपणही सातत्याने आपल्या भागातील शेतकरी व ऊस उत्पादकांच्या दृष्टीने हा कारखाना सुरू राहणे हे गरजेचे समजून तो चालवला.
मात्र मधल्या काळात साखर विश्वावर आलेले आर्थिक संकट, डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती व इतर अनेक कारखान्यांना झालेली सरकारी मदत आपल्याला मिळाली नाही. केवळ आपल्या वैद्यनाथ कारखान्याला सरकारी मदत मिळू शकली नाही ही परिस्थिती सर्वश्रुत व सर्वज्ञात आहे.
याच आर्थिक बिकट परिस्थितीतून राज्यातील अनेक कारखान्यांना टाळे लावावे लागले आहे. वर्षानुवर्ष अनेक कारखाने ताळेबंद असून त्यांना गंज लागलेला आहे. हा कारखाना त्याच पद्धतीने ताळेबंद होऊ द्यायचा होता का? आपल्या कारखान्यालाही टाळे लावून गंज चढू द्यायचा होता का? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंडे साहेबांच्या दृष्टीने या भागातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य होते.
शेतकरी हितालाच आपणही प्राधान्य दिले. या भागातील शेतकरी, ऊस उत्पादक यांच्या हितासाठी हा कारखाना सुरू राहणे अत्यंत आवश्यक होते हे सर्वांना माहित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून यावरून मुंडे साहेबांचा आत्मा विकला मुंडे साहेबांनी चौथ्या अपत्याप्रमाणे सांभाळलेला कारखाना मारला अशा पद्धतीने निरर्थक अशा टीकाटिप्पण्या केल्या जात आहेत. यावर बोलणे आपण टाळले होते. मात्र आपण अनैतिक असे कोणतेही कृत्य केलेले नाही.
मुंडे साहेबांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना कसा सुरू राहील हे बघितलेले आहे. त्यामुळे कारखाना विकला असे नाही तर मुंडे साहेबांचे चौथे अपत्य जगवण्याचाच आपण प्रयत्न केला असल्याचे पंकजा मुंडे यांनी ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताआड कोणीही येऊ नये. यावर्षीही वैद्यनाथ साखर कारखाना दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असून यामुळे या भागातील शेतकरी व ऊस उत्पादकांच्या न्याय व हिताचीच भूमिका आपण घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.