वडवणी : मध्यरात्रीची वेळ... शहरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत नाकाबंदी सुरू होती... संशयास्पद इनोव्हा वाहन दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र वाहन थांबविण्याऐवजी चालकाने पोलिसांनाच कट मारत भरधाव वेगाने धूम ठोकली. काही क्षणांतच हा प्रकार एका थरारक सिनेस्टाईल पाठलागात परिवर्तीत झाला. पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोतस्करांचा अखेर वडवणी पोलिसांनी पाठलाग करून मोठा डाव उधळून लावत तीन आरोपींना अटक केली.
१४ जूनच्या रात्री ११ ते १५ जूनच्या पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान वडवणी शहरात कडक नाकाबंदी करण्यात आली होती. रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास एमएच-०४ सीडी-९८३५ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची इनोव्हा संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आली. वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने पोलिसांना कट मारत भरधाव वेगाने बीडकडे पळ काढला.
सपोनि वर्षा व्हगाडे यांनी तत्काळ नाकाबंदीवरील पथकाला सतर्क केले. जगताप पेट्रोलपंपाजवळील पुलावर पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने थेट पोलिसांच्या अंगावरच वाहन घातले. क्षणार्धात प्रसंगावधान राखल्यामुळे पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. अंधार, भरधाव वेग आणि जीवघेणा धोका यांची पर्वा न करता पोलिसांनी प्रतिक्षा हॉटेल परिसरापर्यंत वाहनाचा पाठलाग केला. अखेर एका पुलाजवळ वाहनाचा वेग कमी होताच पोलिसांनी शिताफीने ओव्हरटेक करून इनोव्हा अडविली.
मात्र चालकासह तीन जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये दोन गोवंशीय जनावरे अमानुषपणे बांधून ठेवलेली आढळली. या जनावरांची तत्काळ सुटका करण्यात आली. घटनेनंतर वडवणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पशुसंवर्धन व संरक्षण अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचे धागेदोरे ठाणे व लातूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले. तब्बल सहा दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर २१ जून रोजी आरोपी लामजना (ता. औसा, जि. लातूर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आमिर आसिफ सुर्वे (वय २६), आमेर शब्बीर मेमन (वय ३५) आणि शाहेद अन्वर बिरादार (वय ३३) यांचा समावेश आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.