वडवणी : वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील अप्पर उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प धरण शंभर टक्के भरले असून गुरुवार, दि. 28 ऑगस्ट रोजी या धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना तसेच जनावरांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
उर्ध्व कुंडलीका धरणाची पाणी पातळी 537.10 मीटर इतकी झाली असून, धरणातील उपयुक्तसाठा 100 टक्के इतका झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने धरणात येणाऱ्या मोठ्या येव्यासाठी सुरक्षितता उपाय म्हणून दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अप्पर उर्ध्व कुंडलिका धरणातून सोडण्यात आलेले पाणी थेट नदीपात्रात जात असून सोन्नाखोटा, चिंचवण, कोठरबन, पिंपळटक्का, पहाडी-दहिफळ या गावांतील नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच नदीपात्रात आपली जनावरे सोडु नयेत असा स्पष्ट इशारा विभागाने दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.