Ashti Dead Body Found
कडा : आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा शिवारात बीड–अहिल्यानगर महामार्गालगत शुक्रवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी घाटा शिवारातील महामार्गालगत घाटाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला हा तरुण मृतावस्थेत आढळला. त्याच्याकडे ओळख पटविणारी कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अंगावरील कपडे आणि शरीरावरील गोंदणांच्या आधारे त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
मृताच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा, सोनेरी उभ्या रेषा असलेला शर्ट आहे. त्याच्या डाव्या हाताच्या बोटात पिवळ्या धातूची अंगठी, तर उजव्या कानात पिवळ्या धातूची बाळी आहे. कमरेला लाल रंगाचा करदुडा बांधलेला असून, डाव्या हातात आणि उजव्या पायात काळ्या रंगाचा गोप आहे.
मृताच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये ‘Rani’ आणि ‘A’, तसेच मराठीमध्ये ‘अभिषेक’ असे गोंदलेले आहे. डाव्या मनगटावर त्रिशूळ व डमरूचे चिन्ह, तसेच गिअर बॉक्सचे चिन्ह गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वर्णनावरून संबंधित तरुणाची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. आपल्या परिचयातील किंवा नातेवाईकांपैकी कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने अंभोरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.