Two teams camped in Beed jail all day
बीड : पुढारी वृत्तसेवा बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपींना विशेष सुविधा मिळत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर गुरुवारी बीडच्या कारागृहाची तपासणी पुणे आणि संभाजीनगर येथील दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
सकाळी 11 वाजता दाखल झालेले हे पथक सायंकाळी पाच वाजेपर्यंत तळ ठोकून होते. बीड जिल्हा कारागृह गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले याच्यासह इतर आरोपी तसेच पतसंस्था घोटाळ्यातील सुरेश कुटे, अर्चना कुटे, बबन शिंदे, शाहीनाथ परभणे, चंदुलाल बियाणी, माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह इतर काही कैदी असल्याने या कारागृहातील कारभारावर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे.
यातच दोन दिवसांपूर्वी धनंजय देशमुख यांनी कारागृहात वाल्मीक कराडसह इतर काही कैद्यांना फोन कॉल, व्हीडीओ कॉन्फरन्सींगच्या सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप केला होता. या संबंधीची तक्रार त्यांनी कारागृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. बुधवारी तक्रार होताच गुरुवारी पुणे व संभाजीनगर येथील दोन पथके सकाळी अकरा वाजताच बीड कारागृहात दाखल झाली. यामध्ये आठ ते दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारागृहातील प्रत्येक अभिलेखांची तपासणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल्स तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सींग डिटेल्स तपासले आहेत. तसेच आवश्यक ती कागदपत्र देखील या पथकाने ताब्यात घेतली असून आता या ठिकाणच्या तपासणीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. त्यानंतरच देशमुख यांच्या तक्रारीतील आरोपांमधील सत्यता समोर येऊ शकणार आहे. बीड येथील कारागृहातील कारभाराबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. त्याची चौकशी देखील सातत्यान केली जात आहे.
परंतु या चौकशीच्या झंझटीत आम्हाला अडकायचेच नाही, त्यामुळे अॅलन फोन, बाहेरील मुलाखत, व्हीसी, कॅन्टीन यासारख्या ठिकाणच्या जबाबदारीची ड्युटीच आम्हाला नको असा पावित्रा आता कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. वारंवार येत असलेल्या तक्रारीमुळे चौकशीची झंझट नको, त्यापेक्षा कोणतीही महत्त्वाची जबाबदारी नसलेली ड्युटी द्या, अशी मागणी कर्मचारी करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे, यामुळे कारागृहातील अधिकारी देखील त्रस्त झाले आहेत.
अहवालाकडे लक्ष
गुरुवारी दिवसभर कारागृहात तळ ठोकून असलेल्या दोन पथकांनी महत्त्वाचे दस्तऐवज व सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्सचा डाटा ताब्यात घेतला आहे. त्यानुसार ते आता वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत. त्यामध्ये नेमके काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.