Beed News : आज फुल देतोय, उद्या कारवाई करणार file photo
बीड

Beed News : आज फुल देतोय, उद्या कारवाई करणार

वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक पाटील यांचा अतिक्रमण करणाऱ्यांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

Traffic Police Inspector Patil issues a warning to encroachers

बीड पुढारी वृत्तसेवा : शहरातील बस स्थानक परिसरासह मुख्य रस्त्यावर खाद्यपदार्थ व फळ विक्रेते सर्रासपणे आपले दुकान थाटत होते. या सर्व व्यवसायिकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना करत आज फुल येतोय उद्यापासून कारवाई करणार असा इशारा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिला.

बीड शहरातील अतिशय गजबजलेला भाग म्हणून साठे चौक परिसर तसेच बस स्थानक परिसर ओळखला जातो. या भागात पावभाजी, अंडा भुर्जी चायनीज फूड विक्री करणारे व्यावसायिक आपला व्यवसाय थेट रस्त्यापर्यंत थाटतात. याबरोबरच काही फळ विक्रेते देखील आपल्या दुकान या ठिकाणी मांडत असल्याने खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने थेट रस्त्यावरच उभी करतात यामुळे या भागात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. या बाबीमुळे अनेकदा छोटे मोठे अपघात देखील घडले होते. याची गंभीर दखल आता वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी घेतली आहे.

या भागातील विविध पदार्थ विक्रेते तसेच फळ विक्रेते यांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या तसेच याची तातडीने अंमलबजावणी देखील केली. यामुळे आता बसस्थानक परिसर तसेच साठे चौक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. यावेळी वाहतूक विभागाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या फळ विक्रेते व पदार्थ विक्रेत्यांना गुलाबाचे फुल देत आज आम्ही तुम्हाला विनंती करतोय आणि फुल देतोय.

परंतु उद्यापासून जर अतिक्रमण केले तर मात्र आम्ही कारवाई करू असा इशारादेखील दिला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईमुळे आता या भागातील वाहतुकीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे. याच भागात थांबत असलेले रिक्षा तसेच गेवराईकडे प्रवासी घेऊन जाणारे रिक्षा यांच्यावर देखील अशाच पद्धतीने कारवाई करावी अशी मागणी देखील आता केली जात आहे.

वाहतुकीला अडथळा झाल्यास गुन्हे दाखल करणार

बीड शहरातील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु या वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने कोणी अतिक्रमण करत असेल तर त्यावर नगरपालिकेच्या मदतीने कारवाई केली जाईल सुरुवातीला अतिक्रमण हटवण्यास आम्ही वेळ दिला आहे, विनंती देखील केली आहे. परंतु यानंतरही कोणी जर अशा पद्धतीचे अतिक्रमण केले तर मात्र आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी सांगितले.

इतर भागांत देखील कारवाई व्हावी

बीड बस स्थानक व साठे चौक परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. याबरोबरच या भागातील विक्रेत्यांना सूचना देखील करण्यात आले आहेत. अशाच पद्धतीने शहरातील इतर प्रमुख रस्त्यावर देखील फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते व पदार्थ विक्रेते आपले दुकान मांडत असतात. त्यांनादेखील अशाच पद्धतीने सूचना देऊन हे प्रकार थांबवावेत अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT