नेकनूर, पुढारी ऑनलाईन डेस्क : शालेय जीवनात ‘लाल चिखल’ हा धडा वाचताना अनेकांनी शेतकऱ्याच्या वेदनेला समजून घेतलं असेल. पण आजही तो धडा पुस्तकापुरता न राहता वास्तवात उतरतोय. बीड तालुक्यातील मुळकवाडी येथील अशोक ढास या शेतकऱ्याच्या नशिबीही तोच 'लाल चिखल' आला आहे. टोमॅटो पिकवूनही, भाव न मिळाल्याने शेतातच सडायला लागले आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे बोलले जाते. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन विक्रीला परवडत नसल्याने झाडावरच पिकुन गळत असून टोमॅटो बरोबरच कष्टही मातीमोल ठरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यात भाव मिळेल या आशेवर अशोक ढास यांनी एका एकरावर टोमॅटोची लागवड केली. पीक चांगलं आलं, पण भाव दहाच रुपये किलो! अशा भावात विकून त्यांच्या कष्टाचं मोलच मिळेना. खत, बियाणं, मजूरी, वाहतूक… सगळ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर म्हणजे थेट तोट्यात जाणारा व्यवहार!
उन्हाच्या झळीत टोमॅटो झाडावरच पिकून गळू लागलेत. भाव नसल्यामुळे तोडायलाही परवडत नाही. विक्रीसाठी चाकण, पुणे, नारायणगावला टोमॅटो पाठवले जात आहेत, पण वाहतूक, आडत, कमिशन आणि मजूरी यातच ८० ते ९० रुपये खर्च होतो. त्यात मिळणारा केवळ १०० रुपयांचा दर म्हणजे भरलेलं कॅरेटसुद्धा घाट्यात जातं.
गेल्या वर्षी टोमॅटोला शंभर रुपये किलो भाव होता. त्याच आशेवर ढास यांनी पीक घेतलं. पण यंदा शंभर रुपयांच्या स्वप्नांना दहा रुपयांत जमीन दाखवली गेलीय. “टोमॅटो विकायला काढायलाही परवडत नाही… एवढंही मिळत नाही की खर्च भागेल…” अशा हतबल शब्दांत ढास आपली व्यथा सांगतात.
बाजारात टोमॅटोची आवक वाढलीय, त्यामुळे भाव कोसळलेत. पण याचा फटका थेट शेतकऱ्याच्या उरावर बसतोय. कष्टाचं पीक विकता येत नाही आणि मेहनतीचं चीज न होता स्वप्नं झाडावरच गळून पडतायत.
गेल्या वर्षी टोमॅटोला जवळपास १०० रूपये किलो भाव मिळाला होता. म्हणून टोमॅटोची लागवड केली. एकरी सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च आला. टोमॅटोचे पिक सुद्धा चांगले आले आहे.मात्र भाव नसल्यामुळे टोमॅटो विक्रीसाठी काढायला सुद्धा परवडत नाही. १०० रूपये कॅरेट भाव असुन चाकण,पुणे, नारायणगाव याठिकाणी विक्री साठी पाठवतोत.पण कॅरेट मागे वाहतुक खर्च ६० रूपये, टोमॅटो तोडण्यासाठी महिला मजूर ३०० रूपये रोज तसेच आडत, कमिशन आदी मिळुन ८०-९० रुपये खर्च येतो. म्हणून टोमॅटोची झाडावरच पिकुन गळती होत आहे.अशोक ढास, टोमॅटो उत्पादक शेतकरी, मुळकवाडी