There are no workers available for agricultural work in Beed
शिवनाथ जाधव
टाकरवन, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून शेती करणे अधिकाधिक आव्हानात्मक बनले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात पिके काढणीला आली की अतिवृष्टीमुळे नासाडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सालगडी मिळत नसल्याने शेतकरी शेती बटाईने देण्याकडे वळत आहेत. यंदा गुढीपाडवा जवळ आला तरीही सालगडी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. दीड लाख रुपये देऊनही कुणी सालगडी म्हणून राहण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
दहा ते पंधरा एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना घरातील मनुष्यबळावर सर्व शेतीकाम करणे शक्य होत नाही. त्यामुळे ते सालगडीवर अवलंबून असतात. मात्र सध्या बांधकाम, वीटभट्टी, ऊसतोडणी, मंदिर बांधकाम तसेच हॉटेल उद्योगात अधिक मजुरी मिळत असल्याने ग्रामीण भागातील कामगार शहरांकडे वळत आहेत.
परिणामी शेतीसाठी मजूर टंचाई तीव्र झाली आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न घटत असताना खर्च मात्र वाढत चालल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. अनेक गावांत स्थानिक पातळीवर सालगडी उपलब्ध नसल्याने इतर जिल्ह्यांतून मजूर आणण्याची वेळ येत आहे. रोजंदारी, ठेकेदारी आणि 'हातावर पैसा' या पद्धतींचा वापर वाढताना दिसत आहे.
खर्च वाढला, भाव नाही
दरवर्षी शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च गगनाला भिडला आहे; मात्र उत्पादनाला बाजारभाव मिळत नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्पन्न घटत असल्याने शेती परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे अनेक जण जमीन बटाईने किंवा ठोक्याने देऊन ठराविक रक्कम घेणे पसंत करत आहेत. असे शेतकरी रामप्रसाद गोबरे, हनुमान वराट, दत्ता भुंबे यांनी सांगितले.