MLA Suresh Dhas : ऊसतोड मजुरांचा संप कारखान्यावर गेल्यानंतर होणार file photo
बीड

MLA Suresh Dhas : ऊसतोड मजुरांचा संप कारखान्यावर गेल्यानंतर होणार

आमदार सुरेश धस यांचा इशारा; वडवणीमध्ये ऊसतोड मजूर, वाहतूकदार संघटनेचा मेळावा

पुढारी वृत्तसेवा

The sugarcane cutters' strike will take place after they reach the sugar factory

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्धातून लाखो ऊसतोड मजूर ऊसतोडीसाठी जाणार आहेत. त्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा याकरिता यावर्षी संप केला जाणार आहे. परंतु तो संप हे मजूर कारखान्यावर गेल्यानंतर जाहीर केला जाईल. तीन वर्षाचा करार संपला असल्याने बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी देखील उपस्थित राहिले पाहिजे असे आ. सुरेश धस यांनी म्हटले आहे.

गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर, मुकादाम व वाहतूकदार संघटनेचा मेळावा गुरुवारी वडवणी येथे आयोजीत करण्यात आला होता. संघटनेचे नूतन अध्यक्ष संजय तिडके व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ऊसतोड मजूर, मुकादाम तसेच राज्यभरातील वाहतूकदार उपस्थित होते.

यावेळी बोलतांना संघटनेचे नूतन अध्यक्ष संजय तिडके म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहे. ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबादला मिळायला हवा, यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून आग्रही असतो. यापूर्वी ज्या ज्या वेळी संप पुकारण्यात आले, त्या त्या वेळी आम्ही यामध्ये सक्रीय सहभागी होतो. यावेळी देखील मजूरांना शंभर टक्के दरवाढ मिळायला हवी.

याबरोबरच वाहतूकदारांचा देखील या करारामध्ये समावेश व्हायला हवा ही आमची प्रमुख मागणी आहे. आजवर वाहतूकदारांचा या करारामध्ये समावेशच झालेला नसल्याने त्यांना वाढ मिळालेली नाही. पेट्रोल, डिझेल, टायर, वाहन दुरुस्ती याचे दर वाढले परंतु ऊस वाहतूकीचे दर मात्र वाढले नाही. त्यामुळे आमची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. सुरेश धस म्हणाले की, स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऊसतोड कामगारांच्या लढ्यात नेहमी सहभागी होत आलेलो आहेत. बीड जिल्हाच या ऊसतोड मजुरांच्या लढ्यात लिड करणारा जिल्हा आहे. साखर संघाच्या सोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत मी आग्रही भूमिका मांडलेली आहे.

एव्हढेच नाही तर कोणत्याही मजूर, मुकादम अथवा वाहतूकदाराने मला मदतीसाठी संपर्क साधला तर मी त्याच्या मदतीला धावून जातो, या ठिकाणी एव्हढे मुकादम, मजूर आहेत, कोणालाही विचारा, मी सातत्याने मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी ऊसतोड मजुर संघटना व साखर संघ यांच्यातील करार होणार आहे. यावेळी आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत. सध्या ऊसतोड मजूर कारखान्याकडे जात आहेत, काही पोहचले आहेत.

त्यामुळे त्यांना आम्ही अडवणार नाही. हे मजुर कारखान्यावर गेल्यानंतर आम्ही संप पुकारणार असल्याचे आ.धस यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी होणार बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील उपस्थित रहायला हवे, असे आ.धस म्हणाले. कारण ऊसतोड कामगारांच्या संबंधित कायद्यामध्येच बदल करणे गरजेचे असून त्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहिले तर हा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले. या बैठकीला ऊसतोड मजुर, मुकादम व राज्यभरातील वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

संघटनेची घोषणा; संजय तिडके नूतन अध्यक्ष

वडवणी येथे झालेल्या मेळाव्यामध्ये आ. सुरेश धस यांनी ऊसतोड मजूर, मुकादाम व वाहतूकदार यांच्या संघटनेची घोषणा केली. या संघटनेच्या अध्यक्षपदी संजय तिडके यांची निवडही जाहीर करत राज्यभरातील मुकादम, वाहतूकदारांना या संघटनेमध्ये सहभागी करून घ्या, अशा सूचना आ. सुरेश धस यांनी केल्या.

हेलिकॉप्टरमधून पोहचले मेळाव्याला

आ. सुरेश धस हे ऊसतोड कामगारांच्या वडवणी येथील मेळाव्याला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहचले. या ठिकाणी त्यांनी ऊसतोड मजुराचे प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही कधीही आवाज द्या, मी हजर असेन असेही स्पष्ट केले. मेळाव्यानंतर हेलिकॉप्टरने आ. सुरेश धस हे आष्टीकडे रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT