The risk of accidents has increased due to tractors transporting sugarcane
अतूल शिनगारे
धारूर, पुढारी वृत्तसेवाः धारूर घाटातून वर चढणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांकडून वाहनाचा मोशन टिकवण्यासाठी रस्त्याच्या कडेला ठेवलेले मोठे दगड ओटी म्हणून वापरण्यात येतात. मात्र ट्रॅक्टर वर गेल्यानंतर हे दगड तसेच रस्त्यावरच ठेवले जात असल्याने दुचाकीस्वारांसाठी ते अपघाताचे कारण ठरत आहेत. परिणामी या घाटातून दुचाकीने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे.
ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चढावर थांबवताना ट्रॉली घसरू नये म्हणून मोठ्या दगडांचा आधार घेतात. परंतु काम झाल्यानंतर हे दगड रस्त्याच्या कडेला न ठेवता तसेच रस्त्यावरच सोडून दिले जातात. त्यामुळे घाटातून जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना अचानक समोर येणाऱ्या या दगडांमुळे वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होत असून अनेक वेळा अपघात घडत आहेत.
या दगडांमुळे दुचाकीस्वारांना अपघातास निमंत्रण मिळत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हे दगड दिसून न आल्याने मोठा धोका निर्माण होत आहे. घाटातील अरुंद रस्ता आणि वळणा-वळणाची वाट यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
दुचाकीस्वारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांनी ओटी म्हणून वापरलेले दगड तात्काळ रस्त्याच्या बाजूला ठेवावेत व इतर वाहनधारकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. संबंधित प्रशासनानेही या प्रकाराकडे गांभीयनि लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.