परळी : परळी शहरातील गजबजलेल्या लक्ष्मीबाई टॉवर चौकात रस्त्याच्या मधोमध हळद कुंकू लिंबू टाकून कोंबडे कापत त्याचा बळी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.५) दुपारी घडला. परळीचे माजी नगराध्यक्षांनीच हा प्रकार केल्याची खळबळ उडाल्याने शहरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू होती.
त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट शहर पोलीस ठाणे गाठले. व त्यांनी परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक देशमुख यांच्या विरोधात फिर्याद दाखल दिली. त्यावरून पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून परळीच्या माजी नगराध्यक्षांनीच असा प्रकार केल्याने याची चर्चा होऊ लागली आहे. दीपक देशमुख आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत.