Sunday was a day of traffic jam for the people of Beed.
बीड, पुढारी वृत्तसेवा : दर रविवारी बीड शहरातील सुभाष रोडवरच भाजी विक्रेते ठाण मांडत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. तर दुसरीकडे या भागातील व्यवसायिकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
बीड शहरातील सुभाष रोडलगत भाजीमंडई आहे, त्या ठिकाणी रविवारी बाजार भरतो. या बरोबरच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते दाखल होतात.
या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसता येईल अशी चांगली मोकळी जागा नसल्याने ते थेट रस्त्यावरच आपले दुकान मांडत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या बिंदुसरा नदरीवरील पुल रुंद असल्याने त्याच्या एका बाजुला भाजी विक्रेते बसले तरी वाहतूकीला अडथळा येत नाही, परंतु त्यापुढे रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांची रांग कायम राहते, परिणामी वाहतूकीची कोंडी होते.
दर रविवारी हा प्रकार ठरलेला असून अद्यापपर्यंत नगरपालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलिसांनी यावर कोणताही उपाय योजलेला नाही. या भागातील रहिवाशी, या मार्गावरुन ये-जा करणारे नागरिक तसेच व्यापाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी साध ारणः नऊ वाजता सुरु झालेला हा बाजार दुपारी एक-दोन वाजेपर्यंत कायम असतो. त्यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी होते, यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी या भागातील रहिवाशी, व्यापाऱ्यांनी केली आहे.
व्यावसायिकांना आर्थिक फटका
दर रविवारी डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात अनेक भाजी विक्रेते रस्त्यावरच बसलेले असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते हे आता बीडकरांना पाठ झाले आहे. त्यामुळे रविवारी या रस्त्यावर इतर कोणत्याही खरेदीसाठी ग्राहक फि रकत नाहीत. परिणामी सुट्टीचा दिवस खरेदीचा असतांनाही या भागातील व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागते. परंतु या भागात गेल्यास वाहतूकीची कोंडी होऊन आपल्यालाही अडकून बसावे लागेल हे माहित असल्याने बहुतांश ग्राहक इतर मार्गावरील दुकानांवर खरेदी करणे पसंत करतात. परिणामी सुभाष रोडवरील व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
व्यापाऱ्यांशी चर्चा करणार : फडसे
बीड शहरातील सुभाष रोडवर भाजी विक्रेते बसत असल्याने वाहतूकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच व्यापाऱ्यांनीही यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या भागातील भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे किंवा इतर उपाययोजना करण्याबाबत आपण व्यापाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले.