डॉ. नीलम गोऱ्हे File Photo
बीड

Student sexual harassment case : विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बीड :बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आज या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना लेखी पत्र पाठवून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ही घटना सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारी असून, शिक्षणाच्या उद्देशाने कोचिंग क्लासमध्ये गेलेल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचे मत डॉ. गोर्‍हे यांनी नोंदवले. अशा प्रकारची वर्तनशील अधःपतन असलेल्या व्यक्तींना वेळीच आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

डॉ. गोर्‍हे यांनी स्पष्टपणे म्हटले की, अशा प्रकरणांमध्ये केवळ गुन्हा दाखल करून थांबता कामा नये, तर वेगाने न्यायप्रक्रिया राबवून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी. पीडित विद्यार्थिनीने धैर्याने तक्रार दाखल केली असून, तिच्या मानसिक, सामाजिक व कायदेशीर पुनर्वसनाची जबाबदारीही शासनाची आहे. त्यामुळे, तिच्यासाठी विशेष सल्ला व आधार व्यवस्था त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

कोचिंग क्लासेसवर देखरेख ठेवावी - ठोस सूचना

सर्व खासगी कोचिंग क्लासेसची तत्काळ तपासणी केली जावी.सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या कार्यपद्धतीचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे.प्रत्येक शिक्षण संस्थेसाठी ठोस आचारसंहिता लागू केली जावी.महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी नियमबद्ध मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी केली जावी त्यांनी याबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नयेत यासाठी शासनाने ‘शून्य सहनशीलता’चे धोरण राबवावे, असे तीव्र शब्दांत नमूद केले.

महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी. समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सन्मानासाठी एकत्रित जबाबदारी उचलली पाहिजे,असे उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT