Stones pelted at house for Sarpanch's resignation
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे रविवारी (दि. १३) सायंकाळच्या सुमारास सरपंपदाच्या राजीनाम्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. सरपंचाच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना काठ्या व कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. त्यात सरपंचपतीसह पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, ही घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांमध्ये घडल्याची माहिती आहे.
गावातील विद्यमान सरपंच शाहूबाई राठोड यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आणला जात होता. मात्र त्यांनी राजीनामा न दिल्याने वाद उफाळून आला. रविवारी सायंकाळी विरोधी गटाने सरपंच शाहूबाई राठोड यांच्या घरावर हल्ला चढविला. तुफान दगडफेक करीत आरोपींनी सरपंचपती विजय राठोड, त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईक यांना जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत सर्वांना परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात जखमींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, जखमींचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनेनंतर तांडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आमचे तीन भावांचे कुटुंब इथे राहते. आरोपींकडून आम्हाला सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. कालचा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोप सरपंचपती विजय राठोड यांनी केला आहे.
या घटनेला २४ तास उलटून गेले. अद्याप या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यासाठी विविध कारणे सांगण्यात येत आहे.