Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj erected 'overnight'
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : कायद्याच्या किचकट प्रक्रियेमुळे महापुरुषांच्या स्मारकांचे प्रस्ताव वर्षानुवर्षे रखडत असताना, माजलगाव शहरात एका प्रतिष्ठानने विद्रोही पद्धतीने प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेने शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता शहराच्या संभाजी महाराज चौकात रातोरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवून चौक अक्षरशः दणाणून सोडला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जेसीबी, लोखंडी अँगल, तिरंगा आणि फटाक्यांसह नियोजनबद्ध कारवाई केली. पुतळा बसताच जय छत्रपती संभाजी महाराज ! च्या गजराने परिसर दुमदुमला. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पार पडली. माजलगावातील महापुरुषांच्या स्मारकाबाबत अनेक मागण्या दशकानुदशके प्रलंबित आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ५० वर्षांपासून मागणी प्रलंबित असून लोकनेते सुंदरराव सोळंके स्मारक हे महाविद्यालयाच्या मुख्य गेटसमोर उभा करावयाचे होते मात्र तिथे हि जागा नाकारली. या शिवाय विविध महापुरुषांचे स्मारक प्रस्ताव अजूनही 'कायदेशीर अडथळ्यां'त अडकलेले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी काय झाले तरी पुतळा उभारू असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजलगावातील मध्यरात्रीचा धाडसी प्रकार हे त्याचे प्रात्यक्षिकच मानले जात आहे.