वळीव थांबला..! आता उष्णतेच्या लाटेचा इशारा (AI Image)
बीड

Beed News : उष्णतेच्या दाहकतेने उभ्या पिकाची होरपळ, ऊन-पावसाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याची कसोटी

उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणामध्ये सूर्यनारायण आग ओकू लागला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Standing crops scorched by the scorching heat—a farmer's trial on the threshold between sun and rain

शिरूर : शंकर भालेकर उन्हाळा हंगाम संपत आला असून अवघ्या पाच-सात दिवसात राज्यामध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे काही दिवसातच पाऊसकाळ सुरु होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी उराशी बांधलेली असली तरी उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणामध्ये सूर्यनारायण आग ओकू लागला आहे. उन्हाचा पारा 41 अंशाच्या वर गेला आहे. वाढत्या उष्णतेच्या दाहकतेने शेतातील ऊस, फळबाग, तरकारी, भाजीपाला या पिकांची ऊन -पावसाच्या उंबरठ्यावर होरपळ होऊ लागल्याने ही पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आपली कसोटी पणाला लावावी लागत आहे.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला तरी उन्हाची तीव्रता काही केल्याने कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. उलट गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून उन्हाची दाहकता अधिकाधिक वाढत चालल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उन्हाळा अगदी शेवटच्या टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाऊस पडावा आणि शेती उद्योग मार्गी लागावा अशी अपेक्षा आहे.

मात्र यावर्षी मे महिना संपत आला तरी अद्याप मान्सूनपूर्व पाऊस न बरसल्याने शेतीची पूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर गेल्याने विहिरी -बोर कोरडे पडू लागले आहेत. एकीकडे पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेतामध्ये जोपासलेली, मोसंबी, आंबा, पेरू, डाळिंब आदींची फळबाग, शेतातील भाजीपाला तरकारी, यासह उभा असलेला ऊस पाऊस पडेपर्यंत जगवणे शेतकऱ्यांना मोठे जिकरीचे झाले आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे या पिकांची होरपळ होताना दिसू लागली आहे. विद्युत वितरणाचे अडथळे त्यातच शेतकऱ्यांच्या पाचवीला पुंजलेले आहेत. यामुळे उभे पिक जगवण्यासाठी शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या उंबरठ्यावर आपली कसोटी पणाला लावण्याची वेळ आली आहे.

मान्सूनच्या हुलकावणीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

26 मे रोजी यावर्षी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असे हवामानाची वृत्त आल्याने शेतकऱ्याला यावर्षी मान्सून पूर्व पाऊस, त्याचबरोबर महाराष्ट्रात लवकरच पाऊस सुरू होईल अशी अपेक्षा होती, मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. उन्हाची तीव्रता आणि मान्सूनची हुलकावणी यामुळे शेतकरी राजा पुरता चिंतातूर झाला आहे.

खरिपाच्या पूर्व मशागतीला खिळ

लग्नसराई संपतात शेतकरी राजा खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामासाठी शेतामध्ये राब-राब राबत असतो. शेताची नांगरट झाली की मान्सून पूर्व पडलेल्या पावसाने पूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांना करणे सोयीस्कर होत असते. मात्र यावर्षी अद्याप तरी मान्सूनपूर्व पाऊस न बरसल्याने पूर्व मशागतीची कामे करणे अवघड झाले आहे. त्यातच इंधन दरवाढीची ही भर पडल्याने अतिरिक्त खर्चाची कात्री शेतकऱ्याच्या खिशाला हे तर वेगळेच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT