बीड ः दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बीड तालुक्यातील कुर्ला येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क मंडपात बसण्याची वेळ आली. या ठिकाणच्या टेरेसवर ही सोय करण्यात आली होती. आता संबंधित केंद्रप्रमुखाला निलंबनाचा आहेर देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागाकडून मात्र वरातीमागून घोडं असा प्रकार सुरू असल्याचे दिसते. परीक्षा केंद्र निश्चित करण्याआधीच व्यवस्था पाहणे गरजेचे असताना परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी काय सुविधा आहेत, काय कमी आहे हे पाहणे गरजेचे असताना परीक्षा सुरू झाल्यानंतर अडचणी समोर येत आहेत. असाच प्रकार बीड तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी समोर आला.
या ठिकाणी दहावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी हॉलच उपलब्ध नसल्याने चक्क टेरेसवर मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली होती. फे ब्रुवारीच्या मध्यातच रणरणते उन असताना अशा मंडपात बसून घामाघूम होत विद्यार्थ्यांना पेपर लिहावा लागणार असल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात होता.
एकीकडे शिक्षण विभागाकडून सीसीटीव्ही, झूमच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे बैठक व्यवस्थाही नसल्याचे समोर आल्याने कशा पद्धतीने सगळा कारभार केला जात आहे, हेच समोर आले आहे. आता या केंद्राच्या प्रमुखावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने त्याचा मात्र नाहक बळी जात असल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे.
नवीन केंद्राचीच होते तपासणी
दहावीच्या परीक्षेसाठी एकदा केंद्र निश्चित करण्यात आले की त्या ठिकाणच्या सुविधांची पुन्हा कोणीही पाहणी करत नाही. पूर्वीच्या सुविधांमध्ये काय कमी, अधिक झाले आहे, हे पाहण्याची तसदी परीक्षा बोर्ड अथवा शिक्षण विभाग घेत नाही, परिणामी असे प्रकार होत असतात.
किमान परीक्षा केंद्र निश्चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था तरी का? हे न तपासता परवानगी देणाऱ्या दहावी बोर्डच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी की आहे त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मंडप टाकून का असेना बैठक व्यवस्था करणाऱ्या केंद्र प्रमुखावर कारवाई व्हावी, हा खरा प्रश्न आहे.
156 केंद्रांवर आता ‘झूम’
शिक्षण विभागाकडून प्रत्येक परिक्षा वर्गात सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले होते. परंतु तशी सुविधा होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आता झूम ॲपचा पर्याय शोधण्यात आला आहे. याकरिता जिल्हा परिषद शाळेतील एका तंत्रस्नेही शिक्षाची प्रत्येक केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वर्गखोलीत पर्यपेक्षकाला कोड दिला जातो, त्याने त्या कोडद्वारे त्याने पेपर सुरू होण्यापूर्वी त्याने झूम ॲप जॉईन करून तीन तास मोबाईल सुरू ठेवायचा आहे, आता हा प्रयोग देखील किती यशस्वी ठरतो, हे लवकरच स्पष्ट होते.