परळी वैजनाथ : परळी पासून जवळच असलेल्या गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. वेगात असलेली बस जवळच असलेल्या कॅनालच्या पुलाच्या कडेला येऊन थांबली. वेळीच नियंत्रण मिळाल्याने ही बस कॅनॉल मध्ये पडता पडता सुदैवाने वाचली. या बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
अमरावती एसटी आगाराची बस परळीहून अमरावतीकडे जात होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही बस परळीहून गंगाखेड कडे जात असताना परळी पासून जवळच असलेल्या बीड जिल्हा हद्दीवरील दगडवाडी येथील कॅनल जवळ चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली गेली. ही बस वेगामध्ये होती. जवळच कॅनॉलवरील पूल होता. या पुलाच्या अगदी कडेला कॅनलच्या भिंतीवर येऊन ही बस सुदैवाने थांबली. वेळीच नियंत्रण मिळवता आले नसते तर ही बस अक्षरशः कॅनॉल मध्ये कोसळली असती.
प्रवाशांनी भरलेली ही बस असल्याने अचानक झालेला हा थरार प्रवाशांच्या पोटात कालवा कालव करून गेला. दरम्यान बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच हा अपघात घडत असताना कॅनलमध्ये आता बस कोसळणार असे चित्र दिसत असल्याने प्रत्यक्ष दर्शींचाही काही काळासाठी थरकाप उडाला. सुदैवाने या बसमधील प्रवाशांना काहीही हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र काही क्षणासाठीचा थरार या अपघातात अनुभवायला मिळाला.