New Railway Line Maharashtra
सुभाष मुळे
गेवराई : मराठवाड्यातील प्रवाशांना अनेक दशकांपासून रेल्वे प्रवासासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो. सोलापूर-बीड-छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे हा वळसा टळणार असला, तरी प्रत्यक्षात मार्ग पूर्ण होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे.
रेल्वे मंडळाने धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर मार्गासाठी Final Location Survey (FLS) मंजूर केला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच मार्गाचे नक्की आराखडे, नकाशे आणि खर्च निश्चित होणार आहेत. दुसरीकडे धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर मार्गासाठी सहा कोटींचा निधी सर्वेक्षणासाठी मंजूर झाल्याने कामाला गती मिळाली आहे. दरम्यान, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा काही भाग २०२५-२६ पर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे बीड जिल्ह्याचा संपर्क रेल्वेने लवकरच सुरू होईल. मात्र धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर प्रकल्पाच्या संपूर्ण कामाची मुदत अद्याप निश्चित झालेली नाही.
या प्रकल्पांमध्ये जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय मंजुरी, स्थानिक प्रशासनाशी समन्वय अशा अनेक अडथळ्यांमुळे गती मंदावली आहे. तरीही, गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारकडून निधी आणि तांत्रिक मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाला सकारात्मक दिशा मिळाली आहे. मराठवाड्यातील प्रवाशांच्या अनेक पिढ्यांचा स्वप्नवत असलेला हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रवास अधिक सोपा, थेट आणि वेळ बचत करणारा होणार आहे.