बीड : आजारी असलेल्या चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतरही पैशांअभावी शासकीय रुग्णवाहिका नाकारल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आला आहे. डिझेलसाठी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर रुग्णवाहिकेतून उतरवण्यात आल्याचा आरोप संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यातच, 'चार मुलांचा सांभाळ होत नसेल, तर चार लेकरं कशाला पैदा केली?' असे डॉक्टरांनी म्हटल्याचा व्हिडीओदेखील समोर आला. अखेर मुलीला खांद्यावर घेऊन तिच्या वडिलांना रुग्णालयाबाहेर पडावे लागले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्हाभरातून संताप व्यक्त होत असून, संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
दि. २९ सप्टेंबर रोजी दिंद्रूड येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीत शिकणार्या ११ वर्षीय मुलीला सकाळी सुमारे ११ वाजता अचानक फीट आली आणि ती बेशुद्ध पडली. मुलीची प्रकृती पाहून मुख्याध्यापक मनोहर कटारे आणि शिक्षकांनी तिला तातडीने दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ढाकणे यांनी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात नेण्यास सांगितल्याचे समजते. मुलीला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता तिच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेचा आधार घेतला. मात्र, रुग्णवाहिकेतील डिझेलसाठी पैसे मागण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर बेशुद्ध मुलगी आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परिस्थितीने अगोदरच हतबल झालेल्या वडिलांसमोर आता लेकीला घेऊन पुढे काय करायचे, असा गंभीर प्रश्न उभा राहिला.
याचवेळी डॉक्टरांनी केलेल्या कथित वक्तव्याने कुटुंबीयांच्या वेदनेत आणखी भर पडली. 'आमच्याकडे खायलाच पैसे नाहीत, तर डिझेलसाठी पैसे कुठून आणायचे? आम्ही कष्ट करून चार लेकरांचा सांभाळ करतो,' अशी व्यथा कुटुंबीयांनी मांडल्याचे सांगण्यात येते. त्यावर डॉक्टरांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आईचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कष्टावर चालतो. मुलीला वारंवार फीट येत असल्याचे तिच्या आजीने सांगितले. 'आम्ही कष्ट करून मुलांना खाऊ घालतो. रुग्णालयात घेऊन गेलो; पण पैसे नसल्याने रुग्णवाहिका मिळाली नाही. डिझेलचे पैसे कुठून आणायचे?' असा सवाल करत आजीने आपली व्यथा मांडली.
या प्रकरणाची दखल राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली आहे. संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. डॉ. ढाकणे यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार तातडीने काढून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्याकडे उपसंचालक, आरोग्य सेवा, परिमंडळ लातूर यांच्यामार्फत सादर करण्यात आला आहे. शासनस्तरावरून पुढील आदेश होईपर्यंत ढाकणे यांचे मुख्यालय बीड जिल्हा परिषद राहणार आहे.