वर्षातून एकदाच उघडते मच्छिंद्रनाथांची समाधी pudhari photo
बीड

Machhindranath temple : वर्षातून एकदाच उघडते मच्छिंद्रनाथांची समाधी

गुढीपाडव्याच्या यात्रेसाठी भाविकांची तयारी

पुढारी वृत्तसेवा

कडा ः बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मायंबा (सावरगाव) येथे नवनाथांपैकी आद्यगुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. ही समाधी वर्षातून केवळ एकदाच गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री उघडली जाते. त्यामुळे या दिवशी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी मायंबा येथे येतात.

गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवनाथांचे वास्तव्य असल्याची परंपरा सांगितली जाते. त्यापैकी नगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ, आष्टी तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथ,कारखेल परिसरातील आडबंगीनाथ, मिरावली पहाडावरील मिनीनाथ, जानपीर येथील जालिंदरनाथ आणि हिवरा येथील रेवननाथ (रोडागिरी) अशी नाथांची स्थाने या परिसरात असल्याचा उल्लेख नवनाथांच्या ग्रंथांत आढळतो.

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी विविध ठिकाणांहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीला स्नान घातले जाते. त्यानंतर समाधीला चंदनाचा लेप लावला जातो. या चंदनाचा सुगंध परिसरात दरवळत असतो. रात्री बारा वाजल्यानंतर भाविकांसाठी समाधी दर्शनासाठी खुली केली जाते.पाडव्याच्या पहाटे पाच वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते.

पुढील वर्षीच्या गुढीपाडव्यापर्यंत समाधी बंदच ठेवली जाते. समाधी उघडी असताना पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते, तर पुरुषांनाही स्नान करूनच समाधी दर्शन दिले जाते.त्यामुळे या दिवशी भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण असते.नाथ संप्रदायात श्री मच्छिंद्रनाथांना आद्य नाथाचार्य मानले जाते.

‘कौलज्ञाननिर्णय‌’ या प्राचीन संस्कृत ग्रंथाचे जनकत्वही विद्वानांच्या मते त्यांच्याकडे जाते. नाथपंथाच्या सिद्ध परंपरेत त्यांचे स्थान अत्यंत आदरणीय मानले जाते.श्री गोरक्षनाथांचे गुरू म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.श्रीक्षेत्र मायंबा येथील मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतली असल्याने येथे भक्तांना आध्यात्मिक चैतन्याचा अनुभव येतो. गडावर अखंड धुनी पेटलेली असते, ती कधीच विझत नाही. समाधीच्या पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर असून नाथांनी तिला आपली बहीण मानल्याची परंपरा सांगितली जाते. डोंगराखाली ‌‘देव तळे‌’ नावाचा तलावही आहे.

दर गुरुवारी तसेच अमावास्या आणि पौर्णिमेनंतर राज्यासह राज्याबाहेरून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.तर मच्छिंद्रनाथ जयंती व गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक मायंबा येथे दाखल होतात.

भाविकांसाठी सोयींची व्यवस्था

यंदा यात्रेनिमित्त भाविकांच्या स्नानासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. तसेच दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे,सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

कडक पोलिस बंदोबस्त

गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनातर्फे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT