परळी वैद्यनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी! Pudhari Photo
बीड

Shravan Somvar : परळी वैद्यनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी!

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणकडून भाविकांसाठी सेवाउपक्रम

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ/ प्रा.रविंद्र जोशी

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आज (दि.१२) दुसर्‍या श्रावण सोमवारी परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सोमवारपेक्षा भाविकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली आहे.

हर हर महादेवचा जयघोष करत परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. श्रावणीच्या पर्वकाळात परळीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सोमवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

खिचडी वाटप व लाडकी बहीण योजना नोंदणी शिबीर

दरम्यान धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दर श्रावण सोमवारी भाविकांसाठी उपवासाची खिचडी वाटप व लाडकी बहीण योजना नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, पाणी पाऊचचे वाटप करण्यात येत आहे. भाविकांसाठी पाच क्विंटल साबुदाण्याची खिचडी बनविण्यात आली आहे. वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यात विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजना नोंदणी शिबीराला मोठा प्रतिसाद लाभत आहे.

-नितिन कुलकर्णी, सचिव, नाथ प्रतिष्ठान परळी

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणकडून विद्युत रोषणाई व पुष्पसजावट...

श्रावण मासानिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या 'नाथ प्रतिष्ठाण' या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व संपूर्ण मंदिरासह मुख्य गाभाऱ्यात 21 प्रकारच्या फुलांनी खास सजावट करण्यात आली आहे.

तगडा बंदोबस्त...

श्रावण महिन्यानिमित्त परळीत तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी पोलीसांची सर्वत्र करडी नजर असुन मंदिराच्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपअधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ८७ पोलीस कर्मचारी,२१ महिला पोलीस कर्मचारी, एक दंगल नियंत्रण पथक (४० कर्मचारी), १०० होमगार्ड असा तगडा बंदोबस्त आहे.

दर्शन पास १०० रुपयात

प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होउ नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे दर्शनाच्या तीन रांगा असणार आहेत. महिला, पुरुष यांच्या स्वतंत्र रांगा तर पास धरकांसाठी विशेष रांग आहे. हा दर्शन पास १०० रुपयात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT