बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप होत असलेला आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराड बीडच्या लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पुढे आली आहे. वाल्मीकची नियुक्ती मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मंत्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. या नियुक्तीमुळे मंत्री मुंडेंपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहेे.
राज्यात सध्या संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत असून, या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. सीआयडी कोठडीत असलेला वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या मैत्रीचे, व्यावसायिक भागेदारीबाबत आरोप होत आहेत. त्यामध्ये आता बीडच्या लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी कराडची नियुक्ती मंत्री मुंडेंनी केल्याचे उघड झाले आहे. गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या कराडला मुंडेंनी महत्त्वाचे पद कोणत्या निकषावर दिले, असा प्रश्न विचारला जात आहे.