ठळक मुद्दे
बीड जिल्हा कारागृहात कैद्यांचे धर्मपरिवर्तन करणारे रॅकेट कार्यरत
कैद्यांना वेगवेगळे आमीष दाखवून, गुन्ह्यांतून मुक्तता करण्याचे आमीष
या प्रकरणात कैद्यांनी देखील तक्रार केली असल्याचे बीड येथील वकील राहुल अघाव यांनी म्हटले
बीड : बीड जिल्हा कारागृहात कैद्यांचे धर्मपरिवर्तन करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप अॅड. राहुल अघाव यांनी केला आहे. सोमवारी (दि.6) आ. गोपीचंद पडळकर यांनी देखील असाच आरोप करत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून चौकशीची मागणी केली होती. आता या प्रकरणात कैद्यांनी देखील तक्रार केली असल्याचे अघाव यांनी म्हटले असून या प्रकरणात संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
बीड जिल्हा कारागृहाचे अधिक्षक पिट्स गायकवाड हे सातत्याने वादात अडकतांना दिसत आहेत. यापूर्वी कैद्यांचे मारहाण प्रकरण, कारागृहात आढळलेला गांजा, मोबाईल तसेच कैद्याकडून स्वतःची गाडी धुवून घेतल्याचा व्हीडीओ देखील व्हायरल झाला होता. आता यानंतर अतिशय गंभीर आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्या पाठोपाठ बीड येथील वकील राहुल अघाव यांनी आपल्या पक्षकारांच्या हवाल्याने खळबळजनक आरोप केले असून यामध्ये कैद्यांना वेगवेगळे आमीष दाखवून, गुन्ह्यांतून मुक्तता करण्याचे आमीष दाखवले जात आहे याला न जुमानणाऱ्या कैद्यांना त्रास देखील दिला जात असल्याचा आरोप केला आहे.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कारागृहात दररोज सकाळी भजन केले जायचे, ते भजन देखील कारागृह अधिक्षक गायकवाड यांनी बंद केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो देखील काढले आहेत. या कारागृहात चाललेल्या या सर्व प्रकाराची चौकशी करावी व दहशतीखाली असलेल्या कैद्यांना अभय द्यावे अशी मागणी देखील राहुल अघाव यांनी केली असून या प्रकरणात ते कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
बीड जिल्हा कारागृहाचे अधिक्षक पिट्रस गायकवाड हे रुजू झाल्यापासून सातत्याने वादात अडकत आहेत. कारागृहात गांजा वाटून घेण्याच्या कारणावरुन कैद्यांमध्येच वाद झाला होता. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबरोबरच कारागृह परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी घेवून झाडेच तोडण्याचा प्रकार देखील घडला होता. त्या प्रकरणात देखील चौकशी सुरु असतांना हे नवीनच प्रकरण समोर आल्याने गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.