Parli Vaijnath Gajanan Maharaj Palkhi
परळी वैजनाथ : वैद्यनाथ नगरीत बुधवारी वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पंढरपूर पायीवारी पालखीचे परळी शहरात आगमन होताच भाविकांनी मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि जल्लोषात स्वागत केले.
पालखी आगमनानिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवर वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’, *‘गण गण गणात बोते’*च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हरिहर ऐक्याचे प्रतीक असलेल्या परळी वैजनाथ नगरीत वारकरी संप्रदायाच्या या आगमनाने भक्ती, समता आणि आध्यात्मिक ऐक्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला.
फुलांनी आकर्षक सजविलेल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून संत गजानन महाराजांना अभिवादन केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, वारकरी मंडळे आणि नागरिकांच्या वतीने पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यामुळे संपूर्ण परळी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. वारकरी परंपरेचा उत्साह, शिस्त आणि आध्यात्मिक वैभव अनुभवण्याची संधी भाविकांना लाभली. पालखी मार्गावर सुरळीत व्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि पोलिस विभागाने विशेष नियोजन केले होते.
गुलाब महाराजांच्या पालखीचेही जल्लोषात स्वागत
आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून विविध दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. विदर्भातून येणाऱ्या दिंड्यांनी मराठवाड्यात प्रवेश केला असून त्यामध्ये गुलाब महाराजांच्या पालखीचाही समावेश आहे. ही पालखी बुधवारी परळी शहरात दाखल होताच भाविकांनी तिचेही उत्स्फूर्त स्वागत केले. संत जगमित्र नागा संस्थान येथे पालखीचा मुक्काम असून संत गजानन महाराज आणि गुलाब महाराज यांच्या दोन्ही पालख्या गुरुवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहेत.