गेवराई शहरासह तालुक्यातील मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. Pudhari Photo
बीड

शारदीय नवरात्रौत्सवास उद्यापासून सुरूवात; अशी करा घटस्थापना

पुढारी वृत्तसेवा
गजानन चौकटे

गेवराई : शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवारी (दि.३) पासून सुरुवात होत आहे. या उत्सवासाठी गेवराई शहरासह तालुक्यातील यमादेवी मंदिर, रेणुका माता मंदिर, तलवाडा येथील त्वरिता देवी मंदिर, गढी येथील जय भवानी मंदिर तसेच मादळमोही येथील मोहिमाता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी पूर्णत्वाला आली आहे. पुढील नऊ दिवस देवींचा जागर होणार असून भक्तांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. (Shardiya Navratri 2024)

 भाविकांमध्ये नवचैतन्य पसरले

मंदिरांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केली आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्तीच्या पूजेला पहाटे पासून सुरुवात होणार असल्याची माहिती गेवराई येथील पुजारी सतीश अप्पा रूकर यांनी दिली. दरम्यान, नवरात्रीच्या उपवासासाठी बाजारपेठेत विविध रेडिमेड पदार्थांची रेलचेल झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. यंदा दहा दिवस हा उत्सव असल्याने भाविकांमध्ये नवचैतन्य पसरले असून आनंदाला उधाण आले आहे. पुढचे दहा दिवस आईच्या आरत्यांचा नाद घुमत राहणार आहे. प्रबोधनात्मक उपक्रम देखील होणार आहेत. पोलिस प्रशासन देखील सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी 'दै. पुढारी' शी बोलताना सांगितले. (Shardiya Navratri 2024)

महिषासुरमर्दिनी असे नाव का पडले ?

नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील विविध भागांत नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी, असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते. दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया शक्तीचे या काळात पूजन केले जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात, असे पुजारी राजू देवा जोशी, खांडवीकर यांनी सांगितले. (Shardiya Navratri 2024)

अशी करा  घटस्थापना

१. प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून, तिचा दोन बोटांचा जाड चौकोनी थर लावावा. त्यात पाच किंवा सात धान्ये घालावी. उदा. जवस, गहू, तीळ, मूग, राळे, सावे व चणे इ.

२. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन, त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी.

३. सप्तधान्ये आणि कलशस्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास, त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल, अशी बांधावी.

४. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवीचे ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रांची पारायणे करावीत. त्यामध्ये देवीचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवी भागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमता आणि सामर्थ्यानुसार कराव्यात.

अशी माहिती नागेशशास्त्री चौथाईवाले राक्षभुवन यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT