Shocking Crime News  Pudhari
बीड

Beed news: परळीच्या शक्तीकुंज वसाहतीत आढळला तुटलेला मानवी पाय; नेमका प्रकार काय?

परळी वैजनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहतीत आज सकाळी मानवी तुटलेला पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

Beed news:

परळी वैजनाथ: परळी वैजनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहतीत आज सकाळी मानवी तुटलेला पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळच्या वेळी ही माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरताच 'हा पाय कोणाचा?, नेमके काय घडले?' अशा चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मानवी अवयव वसाहतीत कसा आला, याचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान शक्तीकुंज वसाहतीलगत असलेल्या रेल्वे मार्गावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मृतदेहाचा एक पाय गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर वसाहतीत सापडलेला तुटलेला पाय आणि रेल्वे रुळावरील मृतदेह यांचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार, रेल्वे रुळाजवळील मृतदेहाचा तुटलेला पाय भटक्या कुत्र्यांनी ओढत शक्तीकुंज वसाहतीत आणला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, रेल्वे रुळावर आढळलेल्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मृताची ओळख पटविण्याचे काम रेल्वे पोलीस करीत असून, मृत्यूचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

या संपूर्ण घटनेमुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली असून, रेल्वे पोलीस सर्व बाबींचा सखोल तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीवरून कुत्र्यांनी मानवी अवयव वसाहतीत आणल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT