केज : गौतम बचुटे
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी हा राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे समर्थक आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करू नये, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मस्साजोग येथे केल्याने खळबळ उडाली आहे.
संभाजीराजे छत्रपती १४ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथे आले होते. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात अजित पवार यांच्या पक्षाचे धनंजय मुंडे यांच्या तालुका अध्यक्षांचा समावेश आहे. हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे देखील आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणात नाव समोर आलेले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात घेवू नये, अशी मागणी संभाजीराजे यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. ऐन मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.