बजरंग सोनवणे 
बीड

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर आरोपी अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक

बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप

गौतम बचुटे

केज : ९ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. यानंतर ११ तारखेला या हत्येशी संबधित असलेल्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर १२ डिसेंबरला माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि तिथून आरोपी निघून गेला, असा खळबळजनक आरोप खा. बजरंग सोनवणे यांनी सोमवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपाने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

खा. बजरंग सोनवणे यांच्या सोमवारी केज येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधी खा.सोनवणे यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियाच्या आंदोलनात भेट दिली होती. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख, पिंटू ठोंबरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा. बजरंग सोनवणे म्हणाले, २८ मे रोजी खंडणीच्या प्रकरणाला सुरूवात झाली. यानंतर २९ नोव्हेंबरला पुन्हा खंडणी मागितली. पुढे ६ डिसेंबर रोजी खंडणी वरून आवादा कंपनीच्या परिसरात वाद झाला. याच वादाचा राग मनात धरून ९ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले, यानंतर ११ डिसेंबर रोजी खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होतो. पुढे १२ डिसेंबरला हाच आरोपी माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतो आणि तिथून निघून जातो, असेही ते म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मीडियासमोर म्हटलं होतं की, तिसऱ्या आरोपींचे कनेक्शन धाराशिवमार्गे पुण्याला लागतंय का बघा? कारण माझ्या बोलण्यामागे काही लॉजिक होतं. पुढे हा आरोपी धाराशिवमार्गे पुण्याला गेल्याचे समोर आले. खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर झाला. खंडणीच्या आरोपीवर ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. मात्र १२ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी अन् पोलीस अधिकारी यांची भेट झाली असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

याचबरोबर वाल्मिक कराडला पोलिसांची सुरक्षा आहे. तो कुठल्या पदावर आहे? हे मला माहिती नाही. पण त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड आहेत. हे सुरक्षा गार्ड आरोपी सोबत कसे काय? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी यावेळी उपस्थित केला. ११ डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून आरोपीला कोणी-कोणी मदत केली? ३१ डिसेंबरला अटक होईपर्यंत २१ दिवस आरोपीला ज्यांनी मदत केली, त्यांना सहआरोपी का केलं जात नाही ? असेही खा.सोनवणें यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना भेटूनही एसआयटीचे अधिकारी तेच !

संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना पोलीस प्रशासनावर भरोसा राहिलेला नाही. त्यांनी एसआटीमध्ये खंडणीतील आरोपींच्या ऐकण्यातील अधिकारी नियुक्त केल्याचे त्यांना वाटत असावे. यामुळे एसआयटीतील अधिकारी बदलावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण सुचवाल त्या नावाचे अधिकारी देतो, असे म्हटले होते. परंतु अद्याप ते अधिकारी बदलले नाहीत, असेही खा.सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोपींना ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावे

खंडणी आणि खून हे प्रकरण एकमेकांशी संबधित आहेत. या प्रकरणात खंडणीतील आरोपींशी ज्यांचे संबंध आहेत. अशा अनेकांना एसआयटीने चौकशीसाठी बोलविले होते. त्या सर्वांची नावे जाहीर करण्यात यावीत. त्या लोकांचे आरोपींशी काय संबंध आहेत? हे लोकांना कळले पाहिजे. याचबरोबर खून आणि खंडणीतील आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावे, असेही खा. बजरंग सोनवणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT