बीड : मस्साजोग यथील सरपंच संतोष देशमुख यांना क्रूरतेने केलेल्या मारहाणीचे आरोपपत्रातील फोटो हे वायरल झाले असून यात संतोष देशमुख यांना मारहाण करताना तसेच त्यांना मारहाण केल्यावर कशा पद्धतीने मारहाण केली हे फोनवर सांगताना आरोपी हे हसताना दिसत आहेत. याशिवाय आरोपी घुले हा सेल्फी काढताना दिसत असून अतिशय निर्दयीपणे मारहाण करीत असल्याचे या फोटो मधून दिसत आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी तसेच एसआयटी यांनी जवळपास १५०० पानाचे आरोपपत्र हे केज येथील मकोका न्यायालयात दाखल केले असून या आरोपपत्रात घटनास्थळावरून जे काही पुरावे मिळाले तसेच १५ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईल वर जे वीडीओ, तसेच सेल्फी, काही फोटो मिळाले आहेत ते आता व्हायरल झाले आहेत. यात मारहाणीचा कुठेही पश्चाताप आरोपींच्या चेहऱ्यावर दिसत नसून उलट ते हसत हसत हे सर्व करत असल्याचे यात रेकॉर्ड झाले आहे. दरम्यान या हत्या प्रकरणी येत्या १२ मार्च रोजी पहिली सुनावणी ही केज येथील मकोका न्यायालयात होणार आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभागाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आज दिनांक 03 रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनेलवर तसेच समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. ‘सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये’ असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.