सरपंच हत्या प्रकरणी शरद पवार गटाचे बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल.  file photo
बीड

सरपंच हत्या प्रकरण : शरद पवारांचे निष्ठावंत बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : मरळवाडी गावचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला आहे.

एकाने गोळी झाडली दुसऱ्याने कोयत्याने वार केले

याप्रकरणी ग्यानबा गित्ते यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, पाच जणांनी संगनमताने शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे व ग्यानबा गित्ते या दोघांना बोलावून घेतले. यावेळी बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का, असे बबन गित्ते म्हणाले. तेव्हा पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. बापू आंधळे यांच्या डोक्यात बबन गित्ते याने कमरेचा पिस्तूल काढून गोळी झाडली. दुसऱ्या एकाने कोयत्याने बापू आंधळे यांच्यावर वार केले. तसेच ग्यानबा गित्ते यांना तिसऱ्याने छातीत गोळी मारून जखमी केले.

पाच जणांवर गुन्हा दाखल

गोळीबाराच्या या घटनेत ग्यानबा ऊर्फ गोट्या मारोती गित्ते (वय ३६,  रा. नंदागौळ) हा जखमी झाला आहे. जखमीवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्याचा पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. ग्यानबा गित्ते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी शशिकांत उर्फ बबन गित्ते (रा. बँक कॉलनी),  मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते (वाघबेट), महादेव उद्धव गित्ते (बँक कॉलनी), राजाभाऊ नेहरकर (पांगरी), राजेश वाघमोडे (पिंपळगाव गाढे), यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष पोलीस महानिरीक्षकांची घटनास्थळी भेट

घटनास्थळी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक चेतना तिडके, अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परळी शहरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, स.पो.नी राजकुमार ससाने, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, डीबी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, दत्ता गित्ते, पांचाळ, गोविंद येलमटे, विष्णू फड यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री भेट दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे रात्रीपासून परळीत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT