केज : केज तालुक्यातील सारणी-सांगवी येथील मध्यम प्रकल्प मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसाने ओव्हरफ्लो झाला असून अतिरिक्त पाणी सांडव्यावरून नदी पात्रात वाहून जात आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
केज तालुक्यातील सारणी-सांगवी येथे २०४० मीटर लांबी आणि १३.५१ मीटर उंचीचा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणी पातळी ७०१.८० मीटर असून साठवण क्षमता जवळपास साडेचार दलघमी इतकी आहे. १६ ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाने या प्रकल्पात ६० टक्के पाणी साठा झाला होता. त्यानंतर झालेल्या व मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसाने हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. प्रकल्पात अतिरिक्त झालेले पाणी हे सांडव्यावरून नदी पात्रात वाहून जात असून हा प्रकल्प भरल्याने सारणी, सांगवी या गावांसह इतर गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. तर या परिसरातील ८२४ हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार असल्याने सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.